<
जळगाव – महावितरणच्या बोदवड उपविभागीय कार्यालयासाठीच्या नुतनीकरण केलेल्या वसाहत इमारतीचे उद्घाटन जळगाव परिमंडळाचे उप मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी श्री.अरूण शेलकर यांचे हस्ते नुकतेच संपन्न झाले.
याप्रसंगी जनसंपर्क अधिकारी किशोर खोबरे, उप विभागीय अभियंता दिपक राठोड, कनिष्ठ अभियंता संदिप पवार,अतिश कुलकर्णी, प्रफुल्ल कोकाटे, कनिष्ठ लिपिक सचिन पाटील, पराग बडगुजर आदींची उपस्थिती होती. याप्रसंगी पुढे बोलताना श्री.शेलकर म्हणाले की, बोदवड शहरातील प्रशासकीय कार्यालयांच्या परिसरातच व स्वमालकीच्या इमारतीत महावितरण कार्यालयांचे स्थलांतर झाल्याने नागरिकांची व वीज ग्राहकांची सोय झाली आहे. बोदवड उपविभागीय कार्यालयासह बोदवड ग्रामिण कक्ष 1, बोदवड ग्रामिण कक्ष 2, कोल्हाडी कक्ष, एनगाव कक्ष कार्यालयाचे स्थलांतर या एकाच इमारतीत करण्यात आल्याने कामासाठी येणाऱ्या ग्राहकांचा वेळ वाचेल. सर्व कार्यालये एकाच छताखाली आल्याने समन्वय वाढीस लागुन कर्मचाऱ्यांचे दैनंदिन कामकाजातही गती येईल. इमारत भाड्यापोटी खर्च होणाऱ्या वार्षिक महसुलातही बचत होईल.
बोदवड उपविभाग व चार कक्ष कार्यालये बोदवडच्या भुसावळ रोडवरील विद्युत भवन, वसाहती गाळा क्रमांक 4 येथे स्थलांतरीत झाली आहेत, याची वीजग्राहकांनी नोंद घ्यावी असे आवाहन मुक्ताईनगर विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. महेश पाटील यांनी केले आहे.