<
जळगाव-(प्रतिनिधी) -रामानंद नगर परीसरातील जागृती हौसिंग सोसायटीतील जिव्हाळा अपार्टमेंटमध्ये राहणार्या २५ वर्षीय तरुणाने नैराश्येतून राहत्या घराच्या बेडरुममध्ये दोरीच्या सहाय्याने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास उघडकीस आले. याबाबत रामानंद नगर पोलीसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जिल्हा परिषदेचे शिक्षक असलेले राजेंद्र तुकाराम निकम हे ममुराबाद शाळेत कार्यरत आहे. त्यांच्या पत्नीचे १२-१५ वर्षापूर्वीच निधन झाले आहे. त्यामुळे घरी राजेंद्र निकम यांच्यासह आई, दोन्ही मुले राहतात. मोठा मुलगा सारंग उर्फ मोनु राजेंद्र निकम (वय-25) याचे बी.टेक (केमिकल्स)चे शिक्षण पूर्ण झाले असून तो काही दिवसांपूर्वी एका कंपनीत कामाला होता. त्यानंतर त्याने लगेचच नोकरी सोडली होती. गुरुवारी सकाळी बिल भरुन आल्यानंतर सारंग याची आजी घरात त्याच्याजवळ आली. आजी तु पुढच्या खोलीतच थांब असे म्हणून त्याने बेडरुममधील खोलीचा दरवाजा बंद करून घेतला. आजीने दरवाजा ठोकला परंतू त्याने दरवाजा न उघडल्याने आजीने अपार्टमेंटमधील काही तरुणांना याठिकाणी बोलविले. तरी देखील त्याने दरवाजा उघडला नाही. दरम्यान अपार्टमेंटमधील नागरिक व तरुणांनी दरवाजाला धक्का मारुन दरवाजा उघडला असता, त्याने गळफास घेवून आत्महत्या केल्याचे दिसून आले. त्यानंतर नागरिकांनी पोलीसांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलीस कर्मचारी अनिल फेगडे, सुभाष सोनवणे यांनी पंचनामा करून मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केला. घटनास्थळावरून त्याचा मोबाईल पोलीसांनी ताब्यात घेतला आहे.