<
जळगाव, (जिमाका) दि. 13 – केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार लहान मुलांना न्युमोकोकल आजारांपासून सुरक्षित ठेवण्याकरिता न्युमोकोकल कॉन्जूगेट व्हॅक्सीन (PCV) या लसीचा नियमित लसीकरणात समावेश करण्यात आला आहे. जळगाव जिल्ह्यात आदिवासी भागातील पाल (ता. रावेर) ग्रामीण रुग्णालयात या लसीकरण मोहिमेचा शुभारंभ करण्यात आल्याचे वैद्यकीय अधिकारी ग्रामीण रुग्णालय, पाल यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
Streptococcus Pneumoniae या विषाणूमुळे होणारा न्युमोनिया हा पाच वर्षाच्या आतील मुलांमधील मुख्य कारण आहे. यामुळे श्वसनमार्गात अडथळा निर्माण होतो. ज्यामुळे फुप्फुसावर सूज येवून त्यात पाणी भरले जाऊ शकते. यामुळे खोकला, धाप लागणे, श्वास घ्यायला अडचण होणे, आदी त्रास होतो.
आजार गंभीर असेल तर फिट येणे, बेशुध्द होणे कदाचित मृत्यूदेखील होऊ शकतो. या PCV लसीकरणामुळे होणारे आजार आणि मृत्यू आपण टाळू शकतो. लसीकरण मोहिमे आधी सर्व डॉक्टर्स, संबधित आरोग्य आशावर्कर आणि कर्मचारी यांना प्रशिक्षित करण्यात आल्याचे वैद्यकीय अधिकारी ग्रामीण रुगणालय, पाल यांनी सांगितले.
या लसीकरणाचा शुभारंभ (12 जुलै) पाल ग्रामीण रुग्णालय येथे आमदार शिरीषदादा चौधरी यांच्या उपस्थितीत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ एन एस चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला. यावेळी लाभार्थी समर्थ जगदिश लव्हटे याची आई सुवर्णा लव्हटे व निशाण इसब तडवी यांचे गुलाबपुष्प देऊन डॉ सचिन पाटील यांनी स्वागत केले तर मुख्य अधिपरिचारिका सौ कल्पना नगरे यांनी या लसीचा उपयोग आणि त्याचे फायदे उपस्थित मातांना समजावून सांगितले. ही लस आपल्या बाळाला टोचून घेऊन घातक रोगांपासून संरक्षण करण्याचे आवाहन आमदार शिरीष चौधरी यांनी यावेळी उपस्थितांना केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नयना कोळी यांनी केले तर उपस्थितांचे आभार विश्वास राव यांनी मानले. कार्यक्रमास जगदीश लव्हटे, रोहित कोळी, विश्वास पाटील, विशाल दाभाडे, संदीप कोळी, मनोज इंगळे, फिरोज तडवी, गोकुळ चौधरी, गौरव पाटील, आशा वर्कर मीना तडवी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.