<
मुंबई, दि.१५ : राज्यातील अधिकाधिक शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये सहभागी होता यावे यासाठी अर्ज करण्याची मुदत २३ जुलैपर्यंत वाढवून मिळावी अशी मागणी करणारा प्रस्ताव राज्य शासनाने आज केंद्र शासनाकडे पाठविल्याची माहिती कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी दिली.
पीक विमा योजनेसाठी अर्ज करण्याचा आज (१५ जुलै) शेवटची मुदत असून आतापर्यंत सुमारे ४६ लाख शेतकऱ्यांनी अर्ज केले आहेत, असे मंत्री श्री. भुसे यांनी सांगितले. मात्र राज्यातील काही भागात लांबलेला पाऊस, कोरोना प्रतिबंधासाठी असलेले निर्बंध यामुळे शेतकऱ्यांना मुदतीत विमा हप्ता भरणे शक्य झाले नाही. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांना योजनेत सहभागी होता यावे यासाठी सर्व बाबींचा विचार करून केंद्र शासनाने २३ जुलै पर्यंत योजनेस मुदतवाढ द्यावी, अशी मागणी करणारा प्रस्ताव आज राज्य शासनाने केंद्र शासनाकडे पाठविला आहे.