<
जळगाव – (प्रतिनिधी) – वर्तमानपत्र म्हणजे आपला असा एक मित्र जो आपणास दररोज आपल्या सभोवताली काय चालू आहे याची माहिती देत असतो अशा आपल्या मित्राची जवळून ओळख करून त्याविषयी अधिकची माहिती मिळावी या उद्दिष्टांने केसीई सोसायटी संचालित गुरुवर्य प.वि.पाटील विद्यालयात इयत्ता 3री च्या ‘आम्ही बातमी वाचतो’ या घटकावर आधारित ओळख वर्तमानपत्राची या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन उपशिक्षक योगेश भालेराव यांनी मुख्या.रेखा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली घडवून आणले.कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून दैनिक देशोन्नतीचे प्रतिनिधी योगेश सुने यांची उपस्थिती होती.त्यांनी आपल्या जळगाव शहरात तसेच इतरत्र दै. लोकमत , दै. दिव्य-मराठी , दै. सकाळ ,दै. पुण्यनगरी ,दै. देशदूत , दै. देशोन्नती , दै. तरुण भारत , दै. जनशक्ती ,दै. पुण्यप्रताप , दै. लोकशाही ,दै. साईमत इत्यादी वृत्तपत्र आपणास आपल्या आजूबाजूच्या परिसराची माहिती , बातम्या पुरवत असतात.त्यातील प्रत्येक वार्ताहर ,पत्रकार तसेच छपाई पर्यंतचे कार्य करणारे कर्मचारी सदैव आपल्या सेवेसाठी तत्पर असतात.आपला आवाज शासनापर्यंत पोहचवण्यासाठी ते कार्य करतात म्हणून आपल्या अडचणी लवकर सोडवल्या जातात अशा शब्दात त्यांनी वृत्तपत्रांची महती व्यक्त केली.
उपशिक्षक योगेश भालेराव यांनी विविध वृत्तपत्रातील शैक्षणिक ,सामाजिक ,आर्थिक , गुन्हेगारी , क्रीडा ,शहर ,राज्य ,देश अशा विविध प्रकारच्या बातम्या आपणास कोणत्या वर्तमानपत्रात कोणत्या पानावर पाहायला मिळतात याविषयी प्रत्यक्ष वर्तमानपत्र दाखवून स्पष्ट केले.आपणास एखादी गोष्ट वाचायची आहे , सुविचार बघायचा आहे किंवा इतर काही गमतीशीर गोष्टी बघायच्या असतील तर आपण कोणत्या पेज वर जावे हे सांगितले तर प्रत्येक बातमी ही कशा प्रकारची असते व तिचे शीर्षक , हेडलाईन, डेटलाईन याविषयी मार्गदर्शन केले व विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष वर्तमानपत्र हाताळायला दिले.विद्यार्थ्यांनी त्याचा भरभरून आनंद लुटला व त्यांच्या शंका विचारून माहिती घेतली.कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी उपशिक्षिका इंदू चौधरी , चित्रलेखा गुरव ,वायकोळे मॅडम, सुधीर वाणी आदी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.