<
मुक्ताईनगर – (प्रतिनिधी) – जिल्हा कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा व कृषी विभाग मुक्ताईनगर यांच्याद्वारे मौजे उचंदा तालुका मुक्ताईनगर येथे तालुक्याचे आमदार माननीय श्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली निर्यातक्षम केळी उत्पादन व व्यवस्थापन याबाबत शेतकऱ्यांचे प्रशिक्षण व कार्यशाळा आयोजित करण्यात आले. सदर प्रशिक्षणात देसाई फ्रुट्स एक्सपोर्टर कंपनीतर्फे श्री गणेश राजपूत यांनी शेतकऱ्यांना निर्यातक्षम केळी उत्पादन व केळी निर्यात करिता असणारे निकष तसेच शेतकऱ्यांना निर्यातक्षम केळी उत्पादन घेताना घ्यावयाच्या काळजी व घड व्यवस्थापन याबाबत मार्गदर्शन केले.
कार्यक्रमात उपस्थित चांगदेव मुक्ताईनगर येथील प्रगतिशील शेतकरी व केळी निर्यातदार श्री विनायक पाटील यांनी शेतकऱ्यांना बड इंजेक्शन व बँच स्प्रे बाबत प्रात्यक्षिक दाखवून मार्गदर्शन व प्रशिक्षण दिले. तालुक्याचे तालुका कृषी अधिकारी श्री अभिनव माळी यांनी शेतकऱ्यांना फवारणी करताना घ्यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शन करून फवारणी करताना घालायचे प्रोटेक्शन कीट चे महत्व सांगितले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार चंद्रकांत दादा पाटील यांनी मुक्ताईनगर तालुक्यातून गुणवत्तापूर्ण केळी उत्पादन होऊन तालुक्यातील प्रत्येक गावातून केळी निर्यातदार निर्माण व्हावे असे मानस व्यक्त केले व कृषी विभागाच्या उपक्रमाचा त्यांनी कौतुक करत असे कार्यक्रम गावोगावी होतील व जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी निर्यातक्षम व गुणवत्तापूर्ण केळी उत्पादन करावे असे आवाहन केले.
त्यासाठी लागणारे प्रशिक्षण व मदत शासनामार्फत व कृषी विभागामार्फत उपलब्ध करून देण्यात येईल असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमात श्री विनोद तराड अध्यक्ष माफदा महाराष्ट्र राज्य , एडवोकेट भैय्यासाहेब पाटील, गावाचे सरपंच श्री शेषराव पाटील, मंडळ कृषी अधिकारी श्री नितीन पगार, तालुक्याचे बी टी यम श्री सैंदाणे तालुक्यातील सर्व कृषी सहाय्यक व उचंदा गावातील सर्व केळी उत्पादक शेतकरी उपस्थित होते.