<
जळगाव – गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाच्या समन्वय स्नेहसंमेलनाचे उद्घाटन अध्यक्ष डॉ.उल्हास पाटील, डीएम कार्डियोलॉजिस्ट डॉ.वैभव पाटील यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले. याप्रसंगी एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांनी साकारलेल्या चित्रांच्या आर्ट गॅलरीत यावेळी उपस्थीत प्रेक्षक चित्र पाहण्यात रमले.
डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसच्या तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी समन्वय गॅदरिंगचे आयोजन करण्यात आले असून गुरुवार, १९ रोजी सायंकाळी आर्ट गॅलरीचे उद्घाटन करुन समन्वयला थाटात सुरुवात झाली.
याप्रसंगी गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ.उल्हास पाटील, डीएम कार्डियोलॉजीस्ट डॉ.वैभव पाटील, महाविद्यालयाचे रजिस्ट्रार प्रमोद भिरुड यांच्यासह प्राध्यापक वृंद उपस्थीत होते. कोविड नियमांचे पालन करुन सोशल डिस्टन्स ठेवत ढोल-ताशांच्या गजरात पारंपरिक पेहराव करत मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.
याप्रसंगी विद्यार्थ्यांनी साकारलेली विविध प्रकारची चित्रांचे प्रदर्शन आर्ट गॅलरीत लावण्यात आले होते, ही सर्व चित्रे विद्यार्थ्यांच्या नावाने प्रसिद्ध करण्यात आली असून उपस्थीत मान्यवरांनी विद्यार्थ्यांनी आपल्या चित्राचे महत्व काय, त्यातून काय मांडण्याचा प्रयत्न केला आहे, याबाबत माहिती दिली.
मान्यवरांनी देखील वैद्यकीय अभ्यासक्रमाला प्रवेशित असलेल्या विद्यार्थ्यांमधील ह्या कला पाहून कौतुक केले. समन्वय या गॅदरिंगमध्ये सप्ताहभर विविध कार्यक्रमांची रेलचेल आहे. कार्यक्रमासाठी समन्वय आयोजन समितीत संस्कृती भिरुड, अपूर्वा कुलकर्णी, विक्रांत गायकवाड, साक्षी ठाकरे, प्राजक्ता जगताप, आशुतोष तिवारी, पवेली मेनॉन, भावेश फालक, साईसमर्थ साळुंके, किशोर दूधानी आदिंचा समावेश आहे.