<
चौबारी ता. अमळनेर : (प्रतिनिधी) चौबारी गावाची अटल भूजल योजनेत निवड झाली असून गावाचा पाणी प्रश्न कायमस्वरुपी संपणार असल्याने ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे. नुकतीच गावात अटल भूजल प्रकल्प जळगाव अंतर्गत भू वैज्ञानिक विक्रांत ठाकूर व त्यांच्या चमुने भेट देत गाव पातळीवर बैठक घेऊन ग्रामस्थांना प्रकल्पाची सखोल माहिती दिली.
या चमुत ठाकूर यांच्या समवेत भूजल सर्वेक्षण आणि विभाग यंत्रणा अधिकारी संजय खलाणे, मेघराज देसले, दिपक करणकाळ आणि तुषार देवरे यांचा समावेश होता. उपस्थित अधिकाऱ्यांनी ग्राम बैठकीच्या माध्यमातून गावातील लोकांसोबत चर्चा करुन व अध्ययन पद्धतीचा वापर करुन गावाची सखोल माहिती जाणून घेतली.
सदर माहिती पाण्याचा ताळेबंद तयार करण्यासाठी तसेच लोक सहभागातून प्र्रकल्प यशस्वी होण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. या प्रकल्पाअंतर्गत सोमनाथ नाल्याबरोबरच गाव शिवारातील अन्य दोन नाल्यांचे खोलीकरण, रिचार्ज शाफ्ट, कोरडे झालेले बोअर, हातपंप, विहिर पुनर्भरण, सिंचन क्षेत्रात वाढ, शेततळ्यांना प्राधान्य असे विविध कामे मार्गी लागणार आहेत.
सदर प्रकल्प २०२४ पर्यंत चालणार असून आगामी काळात चौबारीकरांची पाण्याची समस्या कायमस्वरुपी संपणार असल्याने गावकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. बैठकीत ग्रामसेवक नितीन मराठे, सरपंच उषाबाई भिल, माजी सरपंच पितांबर कुंभकर्ण पाटील, नाना पाटील, सदस्य विजय पाटील, उल्केश पाटील, रवींद्र मोरे, धनराज पाटील, रावसाहेब पाटील, बापु पाटील, अंगणवाडी सेविका निर्मलाबाई पाटील, मिनाबाई पाटील आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येचे उपस्थित होते.