<
औरंगाबाद(जिमाका)- मराठवाडा वॉटर ग्रीड पाणी पुरवठा योजनेमुळे पैठण तालुक्यातील नागरिकांना मुबलक प्रमाणात पाणी मिळणार आहे. या योजनेच्या अंमलबजावणीतून प्रति मानसी 55 लिटर पाणी देण्याचे नियोजन असल्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले.सहा कोटी आठ लाख रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमीपूजन आणि आरोग्य केंद्राच्या रुग्णवाहिकांच्या लोकार्पणाप्रसंगी ते बालानगर येथे बोलत होते.
या कार्यक्रमास रोहयो मंत्री संदीपान भूमरे, जिल्हा परिषदेचे अविनाश पाटील गलांडे, नरेंद्र त्रिवेदी, जिल्हा परिषदेचे माजी सभापती विलास भूमरे, तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजूनाना भूमरे आदी उपस्थित होते.पाणी पुरवठा मंत्री पाटील म्हणाले, पैठण तालुक्यात मराठवाडा वॉटर ग्रीड योजना करण्यासाठी रोहयो मंत्री भूमरे यांनी सातत्याने पाठपुरावा केला. त्यामुळे 285 कोटी शासनाने मंजूर केले. या योजनेमुळे या विभागातील नागरिकांना मुबलक प्रमाणात पाणी मिळणार आहे. येथील नागरिकांच्या विकासासाठी शासन कटिबद्ध असल्याचेही पाटील म्हणाले.मंत्री भूमरे म्हणाले, बालानगरसह पैठण तालुक्याच्या विविध विकासकामांना यापुढेही प्राधान्य राहील. मराठवाडा वॉटर ग्रीड पाणीपुरवठा योजनेमुळे परिसरात ‘हर घर, हर नल’ होईल.
वॉटर ग्रीड योजनेतून पैठण तालुक्यास जायकवाडी जलाशयातून केवळ अर्धा टीएमसी पाणी लागणार आहे. या योजनेमुळे तालुक्यात पाण्याची कमतरता भासणार नाही. तसेच ब्रह्मगव्हाण उपसा सिंचन योजनेमुळे शेतीला पाणी मिळणार आहे. शासनाच्या विविध योजनांची तालुक्यात अंमलबजावणी करण्यात आली आहे, करत आहे. तालुक्याच्या सर्वतोपरी विकासाला प्राधान्य राहणार असल्याचेही ते म्हणाले. श्री.त्रिवेदी, विकास गोर्डे, शिवाजी गोर्डे यांनीही यावेळी विचार मांडले.ग्रामपंचायततर्फे सत्कारबालानगर ग्राम पंचायतच्या वतीने पैठण वॉटर ग्रीड पाणी पुरवठा योजनेला 285 कोटी मंजूर केल्याबद्दल शासनाचे आणि मंत्री पाटील, भूमरे यांचा पुष्पहार घालून आभार मानत सत्कार करण्यात आला.
मंत्री पाटील यांच्याहस्ते विकासकामांचे भूमीपूजनबालानगर ते थापटी रस्ता डांबरीकरण (2 कोटी 94 लाख), ढोरकीन ते बालानगर रस्ता डांबरीकरण (2 कोटी 42 लाख), बालानगर फाटा ते सॉ-मिल रस्ता डांबरीकरण (23 लाख), बाजारतळ हायमस्ट दिवे (10 लाख), बालानगर ग्रामपंचायतीच्या अंतर्गत असलेल्या ववा येथे हायमास्ट (10 लाख), शाळाखोली (7 लाख), ववा येथील दलित वस्तीत हायमस्ट (4 लाख), कासारपाडळी येथील दलित वस्तीत ड्रेनेज लाईन, लासुरे गल्ली येथे सिमेंट रस्ता व झोपडपट्टी येथे सिमेंट रस्ता (प्रत्येकी 5 लाख)आदी विकासकामांचे भूमीपूजन मंत्री पाटील, मंत्री भूमरे यांच्याहस्ते करण्यात आले. तसेच आरोग्य केंद्राच्या रुग्णवाहिकांचे लोकार्पण करण्यात आले.