<
जळगाव : अटल भूजल योजनेच्या माध्यमातून जल संधारणाची कामे व पाणी आडवा, पाणी जिरवाबाबत जनजागृतीचे संदेश देण्यासाठी आयोजित जल साक्षरता अभियान चित्ररथाचे उद्घाटन २८ रोजी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते ग्रामपंचायत पाळधी येथे करण्यात आले.
पुणे आयुक्तालय भूजल व विकास यंत्रणा येथून निघालेल्या या चित्ररथामार्फत संपूर्ण जळगाव जिल्ह्यात जनजागृती करण्यात येत आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी या रथाला हिरवा झेंडा दाखवत जल साक्षरता अभियान रथाची सुरुवात करण्यात आली.
या रथासोबत भू वैज्ञानिक विक्रांत ठाकूर यांच्या समवेत भूजल सर्वेक्षण आणि विभाग यंत्रणा संजय खलाणे, मेघराज देसले, दिपक करणकाळ आणि तुषार देवरे या टीमचा समावेश असून हे अधिकारी गावागावात जाऊन जल संधारणाची कामे व पाणी आडवा, पाणी जिरवाबाबत जनजागृती करत आहेत. केंद्र शासन व जागतिक बॅँक मार्फत आयोजित ही योजना यशस्वी होण्यासाठी लोकसहभागही तेवढाच महत्वाचा आहे.
शासन स्तरावरुन सर्वतोपरी मदत मिळणार असून तेवढाच लोकसहभाग दिसून आला तर योजना यशस्वी होऊन संपूर्ण गावे सुजलाम सुफलाम होतील, असे जनजागृती करताना भू वैज्ञानिक विक्रांत ठाकुर यांनी प्रतिपादन केले. या चित्ररथास गावागावातून उदंड प्रतिसाद मिळत आहे.