<
जामनेर(शांताराम झाल्टे)- येथील लॉर्ड गणेशा इंग्लिश स्कूल येथे राष्ट्रीय खेळ दिवस आणि मेजर ध्यानचंद जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी झालेल्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शाळेचे चेअरमन अभय बोहरा यांनी भूषविले. हेमंत ललवाणी यांनी कार्यक्रमाचे उदघाटन मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून केले. याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक धनंजय सिंग, चेअरमन अभय सांखला, शिक्षक वृंद आणि विदयार्थी – खेळाडु उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भरत नागले सर यांनी केले. अभय बोहरा यांनी अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्याना क्रीडा विषयक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यानंतर अदित्य देशमुख या विद्यार्थ्याने मेजर ध्यानचंद याच्या जीवनाविषयी माहिती सांगीतली. यावेळी शाळेच्या 11 वर्षे वयोगटाखालील विद्यार्थ्याचा फुटबॉल सामना रंगला. यात ‘अ ‘ संघाने ‘ ब ‘ संघावर 1-0 अशी मात केली. त्या नंतर 17 वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यामध्ये आंतरशालेय फुटबॉलचा सामना रंगला. यात लॉर्ड गणेशा इंग्लिश स्कूल, जामनेर संघाने अंजुमन हायस्कूल, जामनेर संघावर 2-1अशी मात करून सामना जिंकला. दोन्ही फुटबॉल सामन्यात शाळेचे क्रिडा शिक्षक नरेंद्र पाटील आणि आनंद मोरे यांनी काम पाहिले. त्यानंतर जिल्हा परीषद शिक्षक वृंद जामनेर पुरस्कृत टीचर्स क्रिकेट क्लब( टी. सी. सी)आणि लॉर्ड गणेशा इंग्लिश स्कूल शिक्षक यांच्यात क्रिकेटचा सामना रंगला. या वेळी लॉर्ड गणेशा संघाने प्रथम फलंदाजी करतांना निर्धारित 10 षटकात 58 धावा केल्या. अतिशय चुरशीच्या ठरलेल्या ह्या सामन्यात टीचर्स क्लब( टी.सी सी ) संघाने निर्धारित लक्ष 9.2 षटकात गाठून विजय प्राप्त केला.