<
मुंबई:-बॉलिवूड अभिनेता संजय दत्त यानं राजकारण प्रवेशाचं वृत्त फेटाळलं आहे. ‘राजकारणात उतरण्याचा किंवा कोणत्याही राजकीय पक्षात प्रवेश करण्याचा माझा अजिबात विचार नाही,’ असं त्यानं स्पष्ट केलं आहे.
राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांनी मुंबईत झालेल्या एका सभेत संजय दत्तच्या राजकारण प्रवेशावर भाष्य केलं होतं. संजय दत्त २५ सप्टेंबर रोजी रासपमध्ये प्रवेश करणार आहे. विधानसभा निवडणुकीत तो पक्षाचा प्रचार करेल, असंही त्यांनी म्हटलं होतं. जानकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतानाचा संजय दत्तचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानं जानकर यांच्या वक्तव्याला बळकटी मिळाली होती. खरंचच संजूबाबा ‘रासप’मध्ये जाणार की काय, अशी चर्चा होती. मात्र, संजय दत्तनं ती फेटाळली आहे.
‘जानकर माझे चांगले मित्र आहेत. त्यांच्या भावी वाटचालीसाठी मी त्यांना शुभेच्छा देतो. मात्र, कोणत्याही पक्षात जाण्याचा माझा विचार नाही,’ असं त्यानं एका निवेदनात म्हटलं आहे.
संजय दत्तसाठी राजकारण नवे नाही. त्याचे वडील व दिवंगत अभिनेते सुनील दत्त हे काँग्रेसमध्ये होते. काँग्रेसच्या तिकिटावर ते मुंबईतून अनेकदा खासदार म्हणून निवडून आले होते. केंद्रात त्यांनी काही काळ मंत्रिपदही भूषवलं होतं. संजय दत्तची बहीण प्रिया दत्त यांनीही खासदार म्हणून उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं आहे. तर, खुद्द संजय दत्तनं समाजवादीच्या तिकिटावर लखनऊमधून लोकसभा निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, कायदेशीर अडचणींमुळं त्याला माघार घ्यावी लागली होती.