<
जळगाव – परिपूर्ण पोषणासाठी संतुलित आहार अत्यंत महत्वाचा असतो. आपल्या आहारात षडरसांचा समावेश असेल तर तो परिपूर्ण ठरतो आणि शरीरासाठी ही पोषक होतो. असे प्रतिपादन जळगावच्या शासकीय आयुर्वेद महाविद्यालयाचे डीन डॉ. मिलिंद निकुंभ यांनी केले. ते भारत सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयांतर्गत कार्यरत क्षेत्रीय लोक संपर्क ब्यूरो, जळगाव तर्फे ‘पोषणासाठी योग आणि आयुष’ विषयावर आयोजित वेबिनारमध्ये बोलत होते. पोषण माहच्या निमित्ताने जिल्हा परिषद, जळगावच्या सहकार्याने या वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते.
ते पुढे म्हणाले की शरीराचे वय आणि अवस्थेनुसार आहारात समुचित बदल केले तर कोणत्या ही वयात माणूस निरोगी राहू शकतो.
या वेळी बोलताना एम जे कॉलेजच्या सोहम योग आणि निसर्गोपचार विभागाच्या माजी संचालिका डॉ आरती गोरे म्हणाल्या की कोणता ही आजार झाल्यावर त्याच्या उपचारासाठी वापरण्यात येणा-या चिकित्सा प्रणाली महत्वाच्या आहेत पण त्या ही पेक्षा आजार होऊच नये या साठी योग आणि निसर्गोपचाराची मदत घेतली तर अधिक उत्तम. निरोगी आयुष्यासाठी फक्त आहाराच नाही तर विहार आणि विचार ही तेवढेच महत्वाचे. अष्टांग योगाच्या अनुपालनाने माणूस मन आणि शरीर दोन्ही निरामय आणि निरोगी राखून उत्तम आयुष्य जगू शकतो.
या वेबिनारमध्ये एकात्मिक बाल विकास प्रकल्प जलगाव जिल्ह्याच्या पर्यवेक्षिका शितल निम्बाळकर व चाळीसगाव तालुक्याच्या राज देहेरे गावच्या अंगणवाड़ी सेविका सरला देशमुख यांनी आपले मनोगत देखिल व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना नाशिकचे क्षेत्रीय प्रचार अधिकारी पराग मांदळे म्हणाले की मागील दिड वर्षात कोविडच्या महामारीमुळे सर्वांना आपली प्रतिकारशक्ती चांगली ठेवण्याचे महत्व पटले आहे. पोषण चांगले असले तरच प्रतिकारशक्ती चांगली असू शकते. पोषणाला जर आपण योग आणि पर्यायी पारंपरिक चिकित्सा पद्धतींची जोड दिली तर आपण कोणत्या ही आजाराला समर्थपणे सामोरे जाऊ शकतो. वेबिनारचे सूत्र संचालन आणि आभार प्रदर्शन सहायक क्षेत्रीय अधिकारी प्रदीप पवार यांनी केले.
पत्र सूचना कार्यालय, मुंबई व प्रादेशिक लोक संपर्क ब्यूरो, पुणे (महाराष्ट्र आणि गोवा प्रदेश) चे सर्व जिल्ह्यातील अधिकारी, यूनिट इंचार्ज आणि कर्मचारी, अंगणवाड़ी सेविका, मदतनीस, आशा, बचतगटाचे सभासद व इतर लाभार्थी या वेबिनार मध्ये सहभागी झाले होते.
हे वेबिनार यूट्यूबवर उपलब्ध आहे. इच्छुक वेबिनारची लिंक link https://www.youtube.com/watch?v=pPnGPN2cwGY वर क्लिक करून हे वेबिनार बघू शकतात. कृपया सर्वांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन क्षेत्रिय लोकसंपर्क ब्यूरो, जळगाव तर्फे करण्यात येत आहे.