<
सातारा(जिमका)- देशाच्या तसेच राज्याच्या जडणघडणीत अभियंत्यांचे मोठे योगदान आहे. भारतरत्न सर एम. विश्वेश्वरय्या यांचा आदर्श समोर ठेवून अभियंत्यांनी गुणवत्तापूर्ण व दर्जेदार कामे करावीत, असे प्रतिपादन राज्याचे सहकार व पणन मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले.
जिल्हा परिषदेच्या स्व. यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय सभागृहात भारतरत्न सर एम. विश्वेश्वरय्या यांच्या जयंतीचे औचित्य साधून जिल्हा परिषदेच्या उत्कृष्ट कामगिरी केलेल्या अभियंत्यांना आदर्श अभियंता पुरस्काराचे वितरण पालकमंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, उपाध्यक्ष प्रदिप विधाते, शिक्षण व अर्थ समितीचे सभापती मानसिंगराव जगदाळे, महिला व बाल विकास समितीच्या सभापती सोनाली पोळ, समाज कल्याण सभापती कल्पना खाडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जाधव, आर.वाय. शिंदे आदी उपस्थित होते.
पुस्तकी ज्ञानासोबतच लोकांच्या भावना समजून कामे करावीत असे सांगून पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले, शासनाच्या अभियांत्रिकी क्षेत्रामध्ये कामाचे स्वरुप आणि वाढलेली व्याप्ती लक्षात घेऊन रिक्त जागा भरण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा केला जाईल. पुरस्कार प्राप्त अभियंत्यांच्या कामाचा आदर्श इतरांनी घेऊन अधिकचे चांगले काम करावे. आपले काम आयुष्यभर लोकांच्या लक्षात राहील असे उल्लेखनीय काम करावे. ग्रामीण भागातील नागरी सुविधांची कामे दर्जेदार होण्यावर लक्ष केंद्रीत करावे, असे त्यांनी सांगितले.जिल्हा परिषदेकडील रिक्त जागा भरण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्यात येईल, असे श्री. कबुले यांनी सांगितले.
श्री.गौडा म्हणाले, शासन स्तरावर काम करीत असताना अभियंत्यांनी आपल्या कामाचा दर्जा अधिक चांगला ठेवला पाहिजे. कामाचा लौकीक सर्वत्र होईल, असे काम करावे.कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. विधाते यांनी केले. कार्यक्रमास जिल्हा परिषद सदस्य, अभियंते व त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते.