<
जामनेर(शांताराम झाल्टे)- तालुक्यातील ओझर गावात 7 सप्टेंबर रोजी फार मोठे अस्मानी संकट येऊन 5 मिनिटाच्या चक्री वादळाने होत्याचे नव्हते केले आणि संपूर्ण गावकऱ्यांची ची दैना उडून अनेकांच्या घरांची पत्रे उडाली तर संसारोपयोगी वस्तूंचा पार चुराळा झाला. पाऊस आणि वादळ एकाच वेळी आल्याने खाण्यापिण्याची साहित्य भिजून खराब झाले अशावेळी कोणताच आधार नसल्याने सर्व हवालदिल झाले होते.
अशावेळी प्रशासनाच्या मदतीची वाट न पाहता तातडीची गरज देणे गरजेचे होते अश्या वेळी ओझर गावचे कचरूलाल बोहरा यांनी अत्यावश्यक मदतीची सुरुवात केली. त्याच बरोबर प्रहार जनशक्ती पक्षाने किराणा किटचे वाटप करून मदतीचा प्रारंभ केला.
तर बोहरा परिवाराने ही मदतीचा हातभार लावून किराणा किट दिले. तरीही ही मदत अपुरी पडत असल्याने कचरूलाल बोहरा यांचे मन अस्वस्थ होते. त्यांनी लागलीच सेवाभावी संस्था यांच्याशी आपला संपर्क सुरु ठेवला होता. अशातच इंडियन रेड क्रॉस सोसायटी जळगाव युनिटचे पूर्ण कोरोना काळातील मदत कार्य त्यांना माहित होते. त्यांनी मदतीची भावना व्यक्त केली असता इंडियन रेड क्रॉस सोसायटीने होकार देऊन मदतीचा हात पुढे केला. इंडियन रेड क्रॉस सोसायटीचे अध्यक्ष जिल्हा अधिकारी अभिजित राऊत यांचे मार्गदर्शनाखाली दानशूर व्यक्तीकडून देणगी घेऊन साखर, पिठ, तांदूळ, तेल, डाळ, फरसाण, शेगदाणे, चहापावडर, लोणचे, खाकरा, मीठ, चटई, साडी, टि शर्ट, चादर, ताडपत्री, बकेट अश्या जवळपास अत्यावश्यक 18 वस्तूंचे किट तयार करुन 75 कुटुंबांना देण्यात आले.
या सोबतच गर्भवती महिला, लहान बालके व इतर नागरिकांसाठी रूप्रकोस कंपनीचे रोगप्रतिकार शक्ती वाढविणारी औषधे, प्रोटीन पावडर, रक्त वाढीचे ची औषधे तालुका आरोग्य अधिकारी राजेश सोनवणे यांच्या सल्ल्याने देण्यात आली. यावेळी रेडक्रॉस सोसायटीचे उपाध्यक्ष गनी मेमन, मानद सचिव विनोद बियाणी, वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश सोनवणे, रक्तपेढी चेअरमन डॉक्टर प्रसन्नकुमार रेदासनी, आपत्ती व्यवस्थापन समिती चेअरमन सुभाष साखला, जनसंपर्क अधिकारी उज्वला वर्मा यांच्या हातून वाटप करण्यात आले. यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रदीप गायके, विकास महाजन, साहेबराव खैवाडे, रंगनाथ महाजन, बाळू पाटील, गोविंद पाटील, गणेश महाजन, राजू महाजन उपस्थित होते.