<
जळगाव(प्रतिनिधी)- हिपॅटायटीस हा व्हायरल इंफेक्शनमुळे पसरणारा आजार आहे. एचआयव्हीपेक्षाही हिपॅटायटीस हा घातक आजार असून तो संक्रमित सुई तसेच विविध कारणांमुळे व्यक्तीच्या शरिरात पसरतो, मेडिकल असो वा नर्सिंगच्या विद्यार्थ्यांचा रुग्णांशी जवळचा संपर्क येतो. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने गोदावरी फाऊंडेशन संचलित गोदावरी नर्सिंग महाविद्यालय आणि डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना शनिवार, २५ सप्टेंबर रोजी हिपॅटायटिस-बी लशीचे लसीकरण करण्यात आले. गोदावरी नर्सिंग महाविद्यालयातील बीएस्सी प्रथम, द्वितीय, तृतीय, चर्तुथ वर्ष, एमएस्सी नर्सिंग, पीबीबीएस्सी तसेच डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयातील सर्वच विद्यार्थ्यांसाठी हिपॅटायटिस-बी ही लस उपलब्ध करुन दिली असून शनिवार, २५ सप्टेंबरपासून लसीकरणास सुरुवात झाली. पहिल्या टप्प्यात २०० विद्यार्थ्यांना ही लस मोफत देण्यात आली असून ऊर्वरित तीन ते चार दिवसात प्रत्येक विद्यार्थ्याला लस दिली जाणार आहे. याकरीता डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील नर्सिंग स्टाफचे सहकार्य लाभले. या लसीकरण मोहिमेच्या यशस्वीतेसाठी नर्सिंग महाविद्यालय प्रशासनासह डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयातील सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.