<
जळगाव(प्रतिनिधी)- गर्भाशय फुटल्यामुळे गर्भ नलिकेत गर्भधारणा झाल्याने तिसऱ्यांदा प्रसूतीसाठी आलेल्या महिलेचा जीव धोक्यात होता. प्रसंगी समयसूचकता दाखवित शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र विभागाने महिलेला तातडीने रक्त पुरवठा करीत शस्त्रक्रिया केली. त्यामुळे महिलेचा जीव वाचला.
मुक्ताईनगर तालुक्यातील एका ग्रामीण भागात राहणाऱ्या ३२ वर्षीय महिलेच्या यापूर्वी दोन सिझेरियन शस्त्रक्रिया झालेल्या आहेत. ही महिला आता तिसऱ्यांदा गर्भवती होती. सप्टेंबर महिन्यात तिला पोटदुखीचा त्रास सुरु झाला. खाजगी रुग्णालयामध्ये महिलेला कोणीच दाखल करून घेईना. अखेर ग्रामीण रुग्णालय, मुक्ताईनगर येथून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे दि. २३ सप्टेंबर रोजी रात्रीच्या वेळी बेशुद्धावस्थेत तिला दाखल करण्यात आले.
तपासणी दरम्यान आढळले की, तिची गर्भधारणा गर्भाशय बाहेर गर्भनलिकेत झाली होती. अगदी दोन दिवसांपूर्वी गर्भाशय फुटून पोटामध्ये अतिरक्तस्राव झालेला होता. सुमारे तीन ते चार लिटर रक्त वाहून गेलेले होते. रक्तदाब व नाडीचे ठोके लागत नव्हते. तिचे हिमोग्लोबिन दोन होते. धावपळ करून तातडीने पाच रक्ताच्या पिशव्या व पांढऱ्या पेशी तिला देण्यात आल्या. महिलेचा रक्तदाब वाढल्यावर तिची शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रिया दरम्यान डाव्या बाजूची फुटलेली गर्भनलिका काढण्यात आली. अतिशय गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली. आणि महिलेचा जीव वाचला.
सदर शस्त्रक्रिया स्त्रीरोग व प्रसूतिशास्त्र विभाग प्रमुख डॉ. संजय बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ.जितेंद्र कोळी, डॉ. शलाका पाटील, डॉ.सोनाली मुपाडे, डॉ.खुशाली राठोड, डॉ. प्रियंका शेटे, डॉ.हेमंत पाटील, डॉ. संजीवनी आनेराय, डॉ. सुधीर पवनकर, यांच्यासह भूलतज्ञ डॉ. संदीप पटेल, डॉ.काजल साळुंखे, परिचारिका सीमा राठोड, शस्त्रक्रिया गृहातील परिचारिका नीला जोशी व इतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.