<
नाशिक(जिमाका वृत्तसेवा)- निसर्ग आणि पर्यावरणाचा समतोल ही वर्तमानाची गरज आहे तसाच विचार पर्यावरण आणि विकासाच्या बाबतीत सर्वांना करावा लागणार आहे, विकास व पर्यावरण हे जणू एकमेकांचे परस्पर विरोधी शब्द आहेत असे वातावरण अलिकडे सर्वत्र निर्माण झाले असताना ‘मित्रा’ विकास आणि पर्यावरण यांच्यातील सांधा म्हणून काम करेल. तसेच पर्यावरणाचा सन्मान राखूनच शाश्वत विकास शक्य असल्याचे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.
नाशिक येथील महाराष्ट्र पर्यावरण अभियांत्रिकी प्रशिक्षण व संशोधन संस्था ‘मित्रा’ च्या नूतन इमारतीच्या व मुख्य अभियंता कार्यालयाच्या इमारतीच्या ई-उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे अभासी पद्धतीने तर राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ, कृषीमंत्री दादाजी भुसे, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य प्रधान सचिव आशिषकुमार सिंह, पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. संजय चहांदे, सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य प्रधान सचिव सुजाता सौनिक, आमदार नरेंद्र दराडे, सरोज अहिरे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव किशोरराजे निंबाळकर विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लिना बनसोड, मित्रा चे संचालक प्रशांत भामरे, उपसंचालक महुवा बॅनर्जी आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, दिवसेंदिवस निसर्गाची बदलणारी रूपं त्यातून एकापाठोपाठ येणारी तौक्ते, निसर्ग व गुलाब यासारख्या चक्रीवादळांनी मानवी जीवनाला आत्मपरीक्षण करायला भाग पाडले आहे. त्याची प्रचिती आपल्या सगळ्यांना कालच मराठवाडा, विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रात कमी अधिक प्रमाणात आली आहे. या सर्वांची कारणमिमांसा करण्याची आपल्याला गरज आहे. विकासाच्या हव्यासापोटी आपण काही चुकीचे तर करत नाही ना? याचेही चिंतन व्हायला हवे. प्रत्येकाला आपल्या उद्योग व्यवसायाबरोबरच विद्यार्थी म्हणूनही जगावे लागणार आहे, त्यासाठी चांगल्या प्रशिक्षण संस्थांची गरज असते त्यात संपूर्ण देशात ‘मित्रा’च्या रूपाने एक पाऊल पुढे महाराष्ट्र आहे. ही प्रशिक्षण संस्था केवळ राज्य, देशात नाही तर संपूर्ण जगाच्या पर्यावरण अभियांत्रिकी संशोधनात खऱ्या अर्थाने ‘मित्रा’ सारखे काम करेल असा विश्वास वाटतो, असेही यावेळी मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी सांगितले.
पाण्याचे चांगले प्लांट उभारणे हे जसे गरजेचे आहे त्याचप्रमाणे त्या प्लांटच्या माध्यमातून गुणवत्तापूर्ण पाणी घराघरात नळाद्वारे पोहचवण्याचे व्यवस्थापन कौशल्य ही आजची नितांत गरज आहे. अतिवृष्टीमुळे पाणी दारातून घरात जातेय तेच पाणी दारातून न जाता ते नळातून घराघरात कसे पोहोचेल याचे व्यवस्थापन भविष्यात ‘मित्रा’ माध्यमातून होईल असा विश्वास व्यक्त करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संस्थेचे ठिकाण, वातावरण, सोयीसुविधा यांचे कौतुक करून त्यासाठी प्रयत्न करणाऱ्या सर्वांचे अभिनंदन करून नाशिकला आल्यावर ‘मित्रा’ ला आवर्जुन भेट देण्याचे आश्वासन यावेळी दिले.