<
जळगाव(जिमाका वृत्तसेवा)- अन्न व औषध प्रशासन, जळगाव आणि अन्नधान्य व आडत व्यापारी संघटना, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने कृषी उत्पन्न बाजार समिती, जळगांव येथे अन्न सुरक्षा मानके कायदा 2006 अंतर्गत परवाना/नोंदणीबाबत विशेष शिबिर घेण्यात आले.
या शिबिरात अन्न सुरक्षा अधिकारी विवेक पाटील यांनी अन्न व्यावसायिकांना अन्न सुरक्षा मानके कायद्यातील तरतुदींबाबत मार्गदर्शन केले. यात प्रामुख्याने 1 ऑक्टोबरपासून विक्री बिलांवर अन्न सुरक्षा मानके कायद्यातंर्गत परवाना क्रमांक नमुद करणे बंधनकारक असल्याचे सांगितले. तसेच अन्न धान्य घाउक विक्री, अडतदार, अन्न धान्य वितरक तसेच अन्न पदार्थ साठवणुकीसाठी वापरले जाणारे गोदाम याकरीता परवाना/ नोंदणी बंधनकारक असल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी अन्न व्यावसायिकांच्या शंकांचे निराकरण करुन शिबिराच्या अनुषगांने परवाना नोंदणी ऑनलाईन पध्दतीव्दारे सुरू करण्यात आली.
या शिबिराच्या आयोजन शशी बियाणी, अध्यक्ष, अन्न धान्य व आडत व्यापारी संघटना, बाजार समिती, जळगांव, विष्णुकांत मणियार, उपाध्यक्ष, विकास महाजन, सुनिल तापडीया, सचिव यांनी यशस्वीरित्या केले. या शिबिरास अन्न व औषध प्रशासन, जळगांव यांचेतर्फे श्री. यो. कों. बेंडकुळे, सहायक आयुक्त, (अन्न) व श्री. विवेक पाटील, अन्न सुरक्षा अधिकारी, जळगांव हे उपस्थित होते. या शिबिराचा मोठ्या संख्येने आडत विक्रेते व अन्न धान्य विक्रेत्यांनी लाभ घेतला असे श्री. बेंडकुळे यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.