<
जळगांव(प्रतिनिधी)- वाचाल तर वाचाल या उक्तीनुसार ज्ञान हे पुस्तकातून आपल्याला मिळत असते. परंतु सध्याच्या कोरोना काळातील परिस्थिती नुसार विद्यार्थी ग्रंथालयापासून व अवांतर वाचना पासून वंचित आहेत. अजूनही शहरी भागातील १ ली ते ७ वी चे शहरातील वर्ग सुरू नाहीत.
ही गोष्ट लक्षात घेता शिक्षण प्रसारक मंडळातील प.न.लुंकड कन्याशाळेतील उपशिक्षक प्रवीण हिरालाल धनगर यांनी जे पुस्तके नेट वर मोफत उपलब्ध आहेत व शाळेच्या ग्रंथालयातील काही पुस्तके अश्या पुस्तकांची क्यू.आर.कोड असणारी एक पुस्तक सूची तयार केली. क्यू.आर.कोड मोबाईलवर स्कॅन केला त्यात आपण स्कॅन केलेले पुस्तक ओपन होईल आणि त्या क्यू.आर.कोड व्दारे ते पुस्तक वाचता येईल.
क्यू.आर.कोड मुळे वेळेची व श्रमाची बचत होईल. अतिशय जुनी पुस्तके जी हाताळणे शक्य नाही ती ही पुस्तके क्यू.आर.कोड व्दारे उपलब्ध होतील. शाळेतील विद्यार्थीनींना या आधुनिक तंत्रज्ञानाचा भविष्यात अधिक उपयोग करता येईल. सुरूवातीला या पुस्तकसूची मध्ये मराठी संत, पंचतंत्र, बोलणारा मासा, विनोबांनी सांगितलेल्या गोष्टी, बेसिक इंग्लीश ग्रामर, श्यामची आई, गोदान, शिवराय, चिमुकली इसापनीती, राष्ट्रीय हिंदूधर्म, संत ज्ञानेश्वर अमृतानुभव या पुस्तकांचा आस्वाद घेता येईल. त्यात अजून मराठी व्याकरण, शालेय परिपाठ, इंग्रजी स्टोरी, पोयम, गणित, विज्ञान, इतिहास या विषयांवरील क्यू.आर.कोड निर्मिती केली जाणार आहे. लहान मुलांना हे सर्व पुस्तके शोधने अवघड जाते, परंतु क्यू.आर.कोड पुस्तक सूचीद्वारे एका ठिकाणी सहज अशी भरपूर पुस्तके उपलब्ध होवू शकतात.
त्याचा उपयोग ज्ञानार्जनासाठी केला जावू शकतो. या उपक्रमाचा हेतू एकच आहे की, ज्या विद्यार्थीनी घरी आहेत ग्रंथालयातील पुस्तकापासून वंचित आहेत त्यांनी या क्यू.आर.कोड पुस्तीकेव्दारे अभ्यासावी व आपल्या ज्ञानात भर पाडावी. उपशिक्षक प्रवीण हिरालाल धनगर यांनी याआधीही बरेच उपक्रम राबवलेले आहेत. त्यात संगणक कॅटलॉग निर्मिती, इ.१ली ते ८ वी निकालपत्रक सॉफ्टवेअर, कवितांची ऑडिओ सी.डी. याची दखल बालभारतीने घेतली होती.
राष्ट्ररत्न अँप निर्मिती यात समाज सुधारक, क्रांतिकारक व नेते यांची माहिती गुगल प्ले स्टोअर वर मोफत उपलब्ध आहे. दप्तराचे ओझे कमी करणे उपक्रम,जादूची पेटी असे विविध उपक्रम राबवलेले आहेत.
घटस्थापनेच्या पावन दिवशी क्यू.आर.कोड निर्मितीतून इ बुक्स व्दारे “ग्रंथालय आपल्या दारी” या उपक्रमाचे उद्घाटन शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष अॕड. सुशिल अत्रे यांच्या हस्ते झाले. सदर कार्यक्रम प्रसंगी शालेय सहसचिव मीरा गाडगीळ, समन्वयिका पद्मजा अत्रे, रेवती शेदुर्णिकर, मुख्याध्यापिका स्वाती नेवे, सकाळ विभाग प्रमुख मेधा कुलकर्णी उपस्थित होते. सदर उपक्रमाचे अनमोल मार्गदर्शन शाळेच्या मुख्याध्यापिका स्वाती नेवे व सहकार्य ग्रंथालय प्रमुख रूख्मीणी बघे यांचे लाभले.