<
शहादा – येथील शिवरामनगर परिसरातील श्री शिवराम गणेश मंडळार्फे यंदा साध्यापद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्याचा संकल्प करीत कोल्हापूर व सांगली पूरग्रस्तांना 51 हजार रुपयांची मदतनिधी प्रांताधिकारी लक्ष्मीकांत साताळकर यांच्याकडे आज दि.2 रोजी सुपूर्द करण्यात आली.
श्री शिवराम गणेश मंडळाने गणपतीच्या स्थापने बरोबरच कोल्हापूर व सांगली पूरग्रस्तांचे अश्रू पुसण्याचा एक छोटासा प्रयत्न म्हणून त्यांना मदत करण्याचा निर्णय जेष्ठ व युवा वर्गाकडून घेण्यात आला. दरवर्षी मंडळाकडून गणेशोत्सवादरम्यान भजन-कीर्तन, रांगोळी स्पर्धा, सजावट, प्रभोधनपर व्याख्यान आदी कार्यक्रम घेतले जातात मात्र, मंडळाच्या या सर्व उपक्रमांना यंदा फाटा देत जास्त खर्च न करता गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करून पूरग्रस्तांना मदतीचा हात देण्याचा निर्णय घेण्यात आला.
शिवाय गणरायाच्या मूर्तीवरही जास्त खर्च न करता पर्यावरण पुरक शाळू मातीची लहानशी मुर्ती स्थापन करून पर्यावरणचाही संदेश देण्याचा मंडळाकडून प्रयत्न केला जात आहे गाव आपले नसले तरी माणसं आपली आहेत या उदात्त हेतूने माणुसकीचे नाते जोपासत सामाजिक बांधिलकी म्हणून मंडळाला मिळालेल्या वर्गणीतून कोल्हापूर व सांगली, येथील पूरग्रस्तांना 51 हजार रुपयांची मदतनिधी प्रांतअधिकारी लक्ष्मीकांत साताळकर यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला.
यावेळीं मंडळाचे सदस्य जिल्हा सरकारी वकील पुष्पेंद्र पंडीत, धनसिंग गिरासे, लोटनसिंग गिरासे, डी.एस.मोरे, नरेंद्र बागले, रामलाल तावडे, नामदेव शिंपी, भरत शिंपी, डॉ.नरेंद्र गिरासे, सुनील तावडे, प्रल्हाद पटले, प्रकाश पाटील राकेश मोरे, प्रेमसिंग गिरासे नरेद्र शिंपी, बर्डे, सुभाष पाटील, घनश्याम गिरासे, चेतन शिंपी, दिनेश तावडे आदी उपस्थित होते.