<
जळगांव(चेतन निंबोळकर)- राजश्री उमेश नेवे या सखी श्रावणी महिला बहुउद्देशिय संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा असून प्रहार संघटनेच्या जळगाव जिल्हा महिला आघाडी प्रमुख आहेत.
स्त्री शक्तीचा जागर मुळात हेच शीर्षक समर्पक आहे. कारण आज स्वातंत्र्याच्या ७० वर्षानंतर सुद्धा जागर करावा लागतो, स्वातंत्र्याच्या आधीसुद्धा स्त्री ही महत्त्वपूर्ण होती आणि स्वातंत्र्यानंतर मात्र स्त्रियांनी अनेक यशाची शिखरे पार केली आहेत. परिवाराचा मूळ आधारस्तंभ ही स्त्रीच आहे. असंख्य भूमिका त्या सकाळपासून रात्री झोपे पर्यंत बजावत असतात. त्या फक्त नवरात्रीच्या नऊ भूमिका पार पाडत नाही तर असंख्य, अगणित भूमिका पार पाडत असतात. ज्या परिवारात स्त्री ही सुखी आणि समाधानी असेल तो परिवार सुखी समाधानी इतकंच नव्हे तर तो परिवार सुसंस्कृत असतो.
आज स्त्री पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करते असं कोणतंही क्षेत्र आज नाही की ज्या ठिकाणी स्त्रीने आपला डंका वाजवला नाही. तरी मात्र दररोज वर्तमान पत्र उघडल्या नंतर ज्यावेळेस स्त्री वर होणाऱ्या अत्याचार, विनयभंगाच्या बातम्या वाचल्या की मन थरकाप होतं. मला सांगायला सुद्धा खंत वाटते की स्त्री हीच स्त्रीची शत्रू आहे. जसे की सासू सुनेचे भांडण! यात आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. हे त्रिकालाबाधित सत्य आहे की, ज्या परिवारामध्ये माहेरच्या लोकांचा जास्त सहभाग असतो ते घर कधीच टिकू शकत नाही आणि म्हणून जर प्रत्येक सुनेने आपल्या सासर्याला आपल्या सासूला आई-वडिलांसह दर्जा दिला तर वृद्धाश्रम राहणार नाही.
आज वृद्ध सासू-सासरे हे तणावात आहेत. जर प्रत्येक सुनेने म्हणजेच प्रत्येक सासू सासऱ्याला जर आपले आई-वडिल समजलं तर वृद्धाश्रमाची गरज भासणार नाही. म्हणून हा जागर स्त्रीशक्तीचा जागर, स्त्रियांच्या संस्कृतीचा जागर! स्त्रियांनी बलवान व्हावे यासाठी ही नवरात्र असते. नवरात्रीत देवीचा महिमा वर्णन केलेला आहे तर चला आपण सर्वजण मिळून एक मुखाने एकत्र येऊन शपथ घेऊया भारत मातेची कारण भारताला सुद्धा माताच म्हटलं, आजपासून आपण, आपला परिवार जर आपण आपला परिवार सुधारणा आपल्या परिवाराला लक्ष दिलं तर समाजाकडे लक्ष दिले जाईल. पर्यायाने राज्याकडे लक्ष दिले जाईल. पर्यायाने देशाकडे लक्ष दिले जाईल आणि म्हणून चला करुया सुरुवात आपल्या परीवाराकडुन आजपासून परिवारामध्ये आपल्यामध्ये प्रेम वाटू या प्रेमाने राहूया प्रेमाने जगूया