<
जळगाव(जिमाका वृत्तसेवा)- जिल्ह्यातील बालविवाहाचे प्रमाण कमी करून जळगाव जिल्हा बालविवाह मुक्त करणे आणि मुलींच्या सक्षमीकरणासाठी समाजातील प्रत्येकाने पुढे येवून एकत्रितरीत्या बालविवाह विरोधात काम करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केले.
महिला व बालविकास विभाग, यूनिसेफ व सेंटर फॉर सोशल ॲण्ड बिव्हेवियर चेंज कम्युनिकेशन (एसबीसी-३) यांच्या संयुक्त विद्यमाने बालविवाह निर्मूलनासाठी प्रशिक्षकांच्या दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन येथील जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील जिल्हा नियोजन सभागृहात आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.
जिल्हा परिषद अध्यक्षा रंजनाताई पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा कार्यक्रम अधिकारी (महिला व बालकल्याण) देवेंद्र राऊत, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विजयसिंग परदेशी, जिल्हा बालसंरक्षण अधिकारी योगेश मुक्कावार, यूनिसेफ एसबीसी-३ चे निशितकुमार, प्रिया आरते, मीनाकुमारी यादव, पूजा यादव, किरण बिलोरे, नंदू जाधव, नीलेश सातपुते आदी उपस्थित होते. जिल्हा परिषद अध्यक्षा श्रीमती पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. आशिया यांनी बालविवाह रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजना या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले.
बालविवाह निर्मूलनासाठी जिल्हा कृती आराखडा तयार करण्यात येणार आहे. यात ग्रामपंचायत विभाग, शिक्षण विभाग, आरोग्य विभाग, महिला व बालविकास विभाग, जिल्हा बालसंरक्षण कक्ष या विभागांचा समावेश असून या विभागांसोबत मुलींच्या सक्षमीकरणासाठी एकत्रितरीत्या काम करून कृती आराखडा तयार करण्यात येणार आहे. यावेळी जळगाव जिल्हा बालविवाह मुक्त करू अशी शपथ सर्व सहभागींनी घेतली.