<
सांगली(जि. मा. का.)- पोलीस दलाचे कामकाजाचे स्वरूप विस्तारत असून त्यासाठी आधुनिक यंत्रणा, सुसज्ज कार्यालय अत्याधुनिक साधन सामुग्री असणे ही काळाची गरज झाली आहे. सांगली पोलीस दलालाही कामकाजासाठी क्षेत्र कमी पडत असल्याने नविन इमारत असणे ही आवश्यक बाब झाली होती. त्यासाठीच नविन पोलीस अधिक्षक कार्यालय निर्माण करण्यात येणार असून पोलीस दलाच्या सक्षमीकरणासाठी प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी केले.
नविन पोलीस अधिक्षक कार्यालयाचे भूमिपूजन पालकमंत्री जयंत पाटील यांच्याहस्ते विश्रामबाग पोलीस मुख्यालय सांगली येथे संपन्न झाले. यावेळी गृह राज्यमंत्री (ग्रामीण) शंभुराज देसाई, कृषि व सहकार राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, जिल्हा परिषद अध्यक्षा प्राजक्ता कोरे, महापौर दिग्वीजय सुर्यवंशी, आमदार सर्वश्री अरूण लाड, सुधीर गाडगीळ, डॉ. सुरेश खाडे, सुमनताई पाटील, अनिल बाबर, विक्रम सावंत, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मनोजकुमार लोहिया, जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, पोलीस अधिक्षक दीक्षित गेडाम, अप्पर पोलीस अधिक्षक मनिषा दुबुले आदि उपस्थित होते.