<
जळगाव(प्रतिनिधी)- कोरोना या महामारीवर मात करण्यासाठी प्रतिबंधक असलेल्या लसीकरण मोेहिमेत गोदावरी फाऊंडेशनचे कार्य हे सर्वोत्तम असल्याचे मत समता फाऊंडेशनतर्फे व्यक्त करण्यात आले. लसीकरण मोहिमेत गोदावरी फाऊंडेशनने सामाजिक जाणीवेपोटी राष्ट्रकर्तव्य पार पाडले आहे. दरम्यान या कार्याची दखल घेत मुंबईच्या समता फाऊंडेशनतर्फे आज डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयातील डॉक्टर आणि नर्सिंग स्टाफचा प्रशस्तीपत्र व भेटवस्तु देऊन सन्मान करण्यात आला.
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात आयोजीत या कार्यक्रमास अधिष्ठाता डॉ. एन.एस. आर्विकर, रजीस्ट्रार प्रमोद भिरूड यांच्यासह समता फाऊंडेशनचे एरिया मॅनेजर शिवनंद महालिंगे, मॅनेजर मोहन केंद्रे, हेल्थ अॅक्टीव्हिटी इन्चार्ज तानाजी गौंड, हेल्थ ऑफिसर राम लंके, राजेंद्र दौड, गोदावरी नर्सिंग महाविद्यालयाचे संचालक शिवानंद बिरादर, प्रशासन अधिकारी प्रवीण कोल्हे उपस्थित होते. समता फाऊंडेशन हे आरोग्य, बंदीगृह, शिक्षण आणि रोबोटीक शिक्षण या क्षेत्रात कार्य करते. तसेच आदीवासी क्षेत्रातही संस्थेमार्फत काही शाळा दत्तक घेण्यात आल्या.
भुसावळ तालुक्यातील खडका, किन्ही, कन्हाळा बु. आणि खु. या ठिकाणी समता फाऊंडेशन, गोदावरी फाऊंडेशन, ग्रामपंचायत, सहायक जिल्हा आरोग्यधिकारी डॉ. पांढरे यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत लसीकरण शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यात सुमारे १० हजार नागरिकांना पहिला व दुसरा डोस मोफत देण्यात आला. या मोहिमेत गोदावरी फाऊंडेशनचे विशेष सहकार्य लाभले. गोदावरी फाऊंडेशनतर्फे नर्सिंग स्टाफ, डॉक्टर्स उपलब्ध करून दिल्याबद्दल समता फाऊंडेशनच्या पदाधिकार्यांनी संस्थेचे आभार मानले. दरम्यान या निमीत्ताने समता फाऊंडेशनतर्फे डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयातील डॉक्टर, नर्सिंग स्टाफ यांचा प्रशस्तीपत्र व भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला.
तसेच संस्थेचे प्रतिनीधी म्हणून वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एन.एस. आर्विकर, गोदावरी नर्सिंग महाविद्यालयाचे संचालक शिवानंद बिरादर, प्रशासन अधिकारी प्रवीण कोल्हे यांचा प्रातिनिधीक स्वरूपात प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला. भविष्यात गोदावरी फाऊंडेशनच्या माध्यमातून मोतिबिंदु शस्त्रक्रियेसाठीही समता फाऊंडेशन कार्य करणार असल्याचे मान्यवरांनी सांगितले.