<
मुंबई(प्रतिनिधी)- राज्यातील उत्कृष्ट औद्योगिक प्रशिक्षण संस्थांना (आयटीआय) आज कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मंत्री नवाब मलिक यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.
यवतमाळ शासकीय आयटीआय, औरंगाबाद शासकीय आयटीआय आणि कुर्ला येथील डॉन बॉस्को खाजगी आयटीआय यांना अनुक्रमे राज्यस्तरीय प्रथम, द्वितीय आणि तृतीय पुरस्कार प्रदान करण्यात आले. रक्कम अनुक्रमे ५ लाख, ३ लाख व २ लाख रुपये तसेच सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप होते. याचबरोबर विभागीय उत्कृष्ट आयटीआय यांना पुरस्कारांचे वितरण तर राष्ट्रीय कौशल्याचार्य पुरस्कार विजेत्या आयटीआय शिक्षकांना (शिल्पनिदेशक) यावेळी मंत्री श्री.मलिक यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
आयटीआयमध्ये अध्यापनाचे कार्य उत्कृष्टरित्या बजावणाऱ्या राष्ट्रीय कौशल्याचार्य पुरस्कार विजेत्या आयटीआय शिक्षकांना राज्य शासनामार्फत १ लाख रुपयांचा पुरस्कार देऊन गौरविण्यात येईल, असे मंत्री श्री. मलिक यांनी यावेळी जाहीर केले.