<
‘नको त्या’ स्पर्शापासून मुलांचे रक्षण
जळगाव -(प्रतिनिधी)- अनेक लहान मुले व मुलींना वडीलधाऱ्या व्यक्तीकडून किंवा वयाने मोठ्या मुला मुलींकडून अयोग्य स्पर्शाचा अनुभव असतो.असे अनुभव मुलांच्या मनावर खोलवर परिणाम करू शकतात.म्हणून अशा अयोग्य स्पर्शापासून त्यांचे संरक्षण व्हावे व त्यांना या विषयी अधिकची माहिती मिळावी या उद्दिष्टाने केसीई सोसायटी संचालित गुरुवर्य प.वि.पाटील विद्यालयात गणेशोत्सवानिमीत्त इयत्ता 4 थी च्या विद्यार्थ्यांसाठी ‘गुड टच बॅड टच’ या विषयाचा ‘नको तो ओंगळ स्पर्श ‘ हा कार्यक्रम घेण्यात आला.
इंडियन मेडिकल असोसिएशन द्वारा घेण्यात आलेल्या या कार्यक्रमासाठी जळगाव उमवी च्या कौंसेलर डॉ.विना महाजन व गोदावरी मेडिकल कॉलेज च्या फिजिकल डायरेक्टर डॉ.मृणाल चित्ते यांचे तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून मार्गदर्शन लाभले.
त्यात त्यांनी विद्यार्थ्यांना अयोग्य स्पर्शापासून स्वतःचे संरक्षण कसे करावे, शरीराच्या कोणत्या भागाला इतरांचा स्पर्श चालणार नाही व कोणत्या भागाला चालेल हे समजून घेणे, विश्वसनीय व्यक्तीपाशी स्पष्टपणे सांगावे , कुणाला असा अनुभव आल्यास इतरांना त्याची कल्पना द्यावी , जर असा प्रसंग नेहमी होत असेल तर पोलिसांकडे तक्रार द्यावी, अशा प्रकारे विविध चित्रे , व्हिडीओ क्लिप तसेच प्रोजेक्टर च्या माध्यमातून समजावून सांगितले.
प्रसंगी केसीई सोसायटी च्या मानसशास्त्रीय सल्लागार माया काळे, मुख्या.रेखा पाटील , उपशिक्षक नेमीचंद झोपे , अशोक चौधरी ,स्वाती पाटील , योगेश भालेराव आदी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.