<
मुंबई(प्रतिनिधी)- विक्रमी संख्येने दर दिवशी कोविड प्रतिबंधात्मक लस देण्याची राज्याची तयारी आहे आणि यापूर्वी तसे डोसेस दिले देखील आहेत. आता याला अधिक गती आणण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या ३० नोव्हेंबरपर्यंत कमीत कमी पहिल्या डोसमध्ये संपूर्ण राज्याचे १०० टक्के लसीकरण व्हावे, असे उद्दिष्ट जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या तीन नोव्हेंबर रोजी कोविड लसीकरण आढावा घेणार असून यासंदर्भात विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्यासोबत दूरदृश्य प्रणालीद्वारे पूर्वतयारी बैठक झाली. बैठकीस सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे दूरदृश्यप्रणालीव्दारे जालना येथून सहभागी झाले.वर्षा निवासस्थानावरील समिती कक्षात मुख्य सचिव सीताराम कुंटे, सार्वजनिक आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ.प्रदीप व्यास, आरोग्य सेवा आयुक्त एन. रामास्वामी, वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह, मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव विकास खारगे, कोविड टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ. संजय ओक, सदस्य डॉ. शशांक जोशी, डॉ.राहुल पंडित आदी उपस्थित होते.
कोरोनाची साथ अजून गेलेली नाही, ज्यांनी लस घेतली आहे त्यांना संसर्गाची खूप कमी भीती असून अशांच्या जीवाला कमी धोका आहे हे सिद्ध झाले आहे त्यामुळे नागरिकांनी देखील टाळाटाळ न करता दोन्ही डोसेस घेण्यास प्राधान्य द्यावे असेही मुख्यमंत्र्यांनी आवाहन केले आहे. आपापल्या जिल्ह्यात 100 टक्के लसीकरण पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करा, असे निर्देश देताना मुख्यमंत्र्यांनी समाजातील सर्वस्तरातील व धर्मांतील लोकांना या लसीकरण मोहिमेत सहभागी करुन घेण्याच्या सूचनाही केल्या.