<
जळगाव(जिमाका वृत्तसेवा)- राज्यात बहुतांशी जिल्ह्यात झालेल्या सततचा पाऊस व अतिवृष्टीमुळे सोयाबीन बीजोत्पादन क्षेत्र मोठया प्रमाणात बाधीत झाले आहे. त्यामुळे खरीप हंगाम 2022 करीता सोयाबीन प्रमाणीत बियाण्याची गरज विचारात घेउन शासनाचे निर्देशनानुसार महाबीजव्दारे रब्बी/ उन्हाळी 2021-22 हंगामात राबविण्यात येत असलेल्या तृटीपुर्ती सोयाबीन बिजोत्पादन कार्यक्रमात जिल्ह्यातील शेतकरी बांधवानी सहभागी होण्याचे आवाहन महाबीजव्दारे करण्यात आले आहे.
जळगाव जिल्ह्यातील विशेषत: सर्वच तालुक्यातील शेतकरी बांधवाना सोयाबीन बिजोत्पादन कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी जिल्हा कार्यालयाशी संपर्क साधावा. उत्पादीत सोयाबीन वाणाच्या बियाण्यासाठी आकर्षक खरेदी धोरण ठरविण्यात आले असून सोयाबीन उत्पादनासाठी एका गावात कमीत कमी 25 एकर क्षेत्राचे नियोजन होणे आवश्यक आहे. त्यासाठी लागणारे शुल्क बियाणे उचल करतांना भरावयाचे आहे, याची शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी. ज्या शेतकरी बांधवाना महाबीजच्या सोयाबीन बिजोत्पादन कार्यक्रम घ्यावयाचा आहे. त्यांनी महाबीजच्या जिल्हा कार्यालयाशी संपर्क साधुन या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक, महाबीज, जळगाव यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.