<
पुणे(प्रतिनिधी)- माझी वसुंधरा अभियान 2.0 अंतर्गत निश्चित केलेल्या सर्व घटकांसंदर्भात चांगली कामगिरी करावी आणि अभियान यशस्वी करण्यासाठी व्यापक लोकसहभाग वाढवावा अशा सूचना विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिल्या.विभागीय आयुक्त कार्यालयात दूरदृश्य प्रणालीद्वारे माझी वसुंधरा अभियान 2.0 संदर्भात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते.
बैठकीला जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, सहआयुक्त पुनम मेहता, उप वनसंरक्षक रंगनाथ नाईकडे, यशदाचे उपसंचालक मल्लिनाथ कलशेट्टी, इकॉलॉजी सोसायटी विश्वस्त प्रा. गुरूदास नूलकर, विभागीय माहिती उपसंचालक डॉ.राजू पाटोदकर आदी उपस्थित होते.मार्गदर्शन करताना श्री. राव म्हणाले, प्रत्येक घटकासंदर्भात असलेली आव्हाने लक्षात घेऊन अभियानाचे सूक्ष्म नियोजन करावे. नागरिकांना त्यांचे मूलभूत हक्क देण्याच्यादृष्टीनेही अभियान महत्वाचे असल्याने त्याकडे विशेष लक्ष द्यावे.
स्वच्छ भारत अभियानापेक्षा हे अभियान अधिक व्यापक असल्याने नियोजनबद्ध पद्धतीने तयारी करावी. विद्युत वाहन निर्मात्यासोबत बैठकांचे आयोजन करून त्याबाबत जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न करावा. परिसरात झालेल्या वृक्षारोपणाची नोंद घेण्यासाठी विशेष मोहीम राबवावी आणि वृक्ष संवर्धनाचेही नियोजन करावे. जिल्हा परिषद स्तरावर अभियानाच्या नियंत्रणासाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करावा आणि ग्रामीण भागातही शहराप्रमाणे जनजागृतीसाठी समाजमाध्यमांचा उपयोग करावा. अभियान जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी माहिती व जनसंपर्क विभागाचे सहकार्य घेण्यात यावे.