<
जामनेर-(प्रतिनिधी) – सोना हॉस्पिटल जामनेर चे संचालक डॉ. प्रशांत महाजन सेवाभावी वृत्ती जोपासत ग्रामीण भागात जाऊन तळागाळातील नागरिकांना सेवा देत आहेत.
शासनाकडून 100 रु नाममात्र मानधन घेऊन त्यांनी फत्तेपुर, गारखेडा, वाकडी येथे एकाच दिवशी आज 43 कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केल्या व समाजाचे देणे लाभते या उद्देशाने तसेच “Service to Rural people is Service to God.”
हे बिरुद डोळ्यासमोर ठेवून तालुक्यात यापुढेही ग्रामीण भागात अधिकाधिक कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणार असल्याचे मानस डॉ.प्रशांत महाजन यांनी व्यक्त केले.
कोरोना काळात शासकीय यंत्रणेकडून कुटुंब नियोजन शस्त्रक्रियाचे काम खुपच संथगतीने व मोजक्या रुग्णांना देण्यात येत होत्या किंवा काही शासकीय रुग्णालयात कुटुंब नियोजनाचे कामकाज बंद असल्याने सामान्य नागरिकांना साधारणपणे 10 ते 12 हजार आर्थिक भुदंड सोसावा लागला.तालुक्यात सर्वच शासकीय रुग्णालयात कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया सुरू झाल्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
ज्या लाभार्थींना कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करायच्या आहेत त्यांनी आपल्या भागातील आशा,आरोग्य सेविका,स्टाफ नर्स तसेच शासकीय रुग्णालयाशी संपर्क साधावा असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले. उपजिल्हा रुग्णालय जामनेर येथे सुद्धा लवकरच कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया शिबीर दर आठवळ्याला सुरू करण्यात येतील तसेच ग्रामीण रुग्णालय पहुर येथे लेप्रोस्कोपीक कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया तसेच पुर्व नियोजित सिझर मोफत करण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य विभागाच्या वतीने तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राजेश सोनवणे यांनी दिली.
जामनेर तालुक्यात जिल्हा माता बालसंगोपन अधिकारी डॉ. समाधान वाघ,डॉ.जयश्री पाटील व डॉ.प्रशांत महाजन यांच्याकडून कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्यात येतात.
दर वर्षी तालुक्यात एकूण 3188 कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया होणे अपेक्षित आहे. तालुक्यात एकूण 134 कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया झालेल्या आहेत. या महिनाअखेर 1274 कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया होणे अपेक्षित होते.