<
मुंबई(प्रतिनिधी)- कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील ग्रामीण भागातील कुटीर उद्योग, स्वयंरोजगार व बचत गटातील व कष्टकरी महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी उमेदमधील सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांनी समन्वयाने काम करून गरजू महिलांकरिता राबविण्यात येत असलेल्या योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे व संवेदनशीलतेने करावी.
याद्वारे उमेद अभियानाचे राज्यात नाव देशपातळीवर अग्रेसर राहणार असल्याचा विश्वास महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर यांनी आज येथे व्यक्त केला.महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत राज्यातील सर्व विभागीय उपायुक्त व सर्व प्रकल्प संचालक तथा जिल्हा सह अभियान संचालक यांची दोन दिवसांची राज्यस्तरीय परिषद नवी मुंबई येथे आयोजित करण्यात आली त्याप्रसंगी डॉ. वसेकर बोलत होते.
उद्घाटन सत्राचे प्रास्ताविक करतांना राज्य अभियान कक्षाचे अतिरिक्त संचालक परमेश्वर राऊत म्हणाले की, उमेद अभियान अंतर्गत सद्यस्थितीत ग्रामीण महिलांचे स्वयंसहायता समूहांच्या माध्यमातून उत्कृष्ट संघटन झालेले आहे. या चळवळीला अधिक सक्षम करण्यासाठी ही दोन दिवसीय परिषद उपयुक्त ठरणार आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राज्य अभियान व्यवस्थापक रामदास धुमाळे यांनी केले.या कार्यक्रमास राष्ट्रीय साधन व्यक्ती श्रीमती प्रगती गोखले, अवर सचिव श्री.धनवंत माळी, उपसंचालक डॉ.राजेश जोगदंड, उपसंचालक श्रीमती शीतल कदम यांच्यासह विभागीय उपायुक्त, प्रकल्प संचालक, राज्य कक्षातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.