<
जळगाव-(प्रतिनिधी)-युतीच्या जागा वाटपाचे अंतिम सूत्र अद्याप निश्चित झालेले नाही. केंद्रीय गृहमंत्री अध्यक्ष अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे एकत्रितरीत्या बसून त्याबाबत निर्णय घेतील. येत्या २ दिवसात जागा वाटपाचे अंतिम सूत्र ठरणार आहे, अशी माहिती जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी आज येथे दिली.
महाजन पुढे म्हणाले, युतीच्या जागा वाटपाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अमित शाह, देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये लवकरच हे सूत्र ठरणार आहे. मित्रपक्षांना किती जागा द्यायच्या? याबाबत आमची काल चर्चा झाली. या चर्चेला शिवसेनेकडून सुभाष देसाई, आमचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि मी स्वतः उपस्थित होतो. ही चर्चा सकारात्मक राहिली. येत्या २ दिवसात युतीच्या जागा वाटपाच्या सूत्रावर शिक्कामोर्तब होईल, असा दावा यावेळी महाजन यांनी केला.
कदम यांचे वक्तव्य निरर्थक
युतीच्या मुख्यमंत्री पदाबाबत अडीच-अडीच वर्षाचा फॉर्म्युला लोकसभा निवडणुकीच्या काळातच ठरला आहे, असे वक्तव्य करत शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. मात्र, गिरीश महाजन यांनी कदम यांचे वक्तव्य निरर्थक असल्याचे म्हटले आहे. युतीत मुख्यमंत्री पदाबाबत अद्याप काय निर्णय झालाय, याची आपल्याला माहिती नाही. पण याबाबतचा निर्णय देखील अमित शाह, देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे हेच घेणार आहेत. त्यामुळे कोणाच्या म्हणण्याला काही अर्थ नाही, असे सांगत महाजन यांनी कदम यांचा दावा खोडून काढला.