<
जळगाव(प्रतिनिधी)- ‘बहिणाबाई चौधरी यांच्या साहित्यामुळे मराठी बोलीभाषेला महत्त्व प्राप्त झाले आहे. मराठी भाषा समृद्ध असून तिच्या 51 बोली भाषा आहेत…’ असा गौरव सुप्रसिद्ध ज्येष्ठ साहित्यिक ज्ञानपीठ प्राप्त डॉ. भालचंद्र नेमाडे यांनी केला.
जैन इरिगेशनची सेवाभावी संस्था भवरलाल अँड कांताबाई जैन फाउंडेशनच्या बहिणाबाई चौधरी मेमोरियल ट्रस्टतर्फे चौधरीवाडा, जुने जळगाव येथे खान्देशच्या कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचा 70 वा स्मृतिदिन दि. 3 डिसेंबर रोजी साजरा केला गेला. कोव्हीडच्या आव्हानात्मक परिस्थितीचा विचार करून शासनाने ठरवून दिलेल्या नियमानुसार हा छोटेखानी कार्यक्रम संपन्न झाला.
साहित्यप्रेमी व चौधरीवाड्यातील सदस्यांची उपस्थिती यावेळी होती.जैन इरिगेशनचे संस्थापक भवरलालजी जैन यांच्या संकल्पनेतून भवरलाल अँण्ड कांताबाई जैन फाउंडेशनतर्फे जळगावच्या चौधरी वाड्यातील बहिणाबाईंच्या घराचे रूपांतर संग्रहालयात झालेले आहे. बहिणाबाई चौधरी यांच्या रोजच्या वापरातील शेतीची अवजारं, स्वंयपाकाच्या वस्तू, भांडी, पुजेचं साहित्य ह्यांची जपवणूक केली आहे. हा अलौकिक ठेवा पुढील पिढीला पाहता येत आहे. अरे संसार संसार म्हणत संसारातील सुख दुःखांच्या साक्षीदार असलेल्या अनेक गोष्टी या संग्रहालयात बघायला मिळतात.
हे संग्रहालय फक्त बहिणाबाईंच्या वस्तूंचं, आठवणींचे संग्रहालय नाही तर या भागातील कृषीजन संस्कृतीत राबणाऱ्या, कष्टकरी महिलांच्या आठवणींचा, श्रमाचा हा ठेवा म्हणता येईल. जळगावात जेव्हा लेखक कवी येतात तेव्हा ते आवर्जून या वाड्याला भेट देतात आणि बहिणाबाईंच्या काव्याची निर्मिती ज्या ठिकाणी फुलली त्या ठिकाणी दर्शन घेऊन नतमस्तक होतात. भवरलाल भाऊंच्या दूरदृष्टीतून ही लाख मोलाची गोष्ट जैन परिवाराने जतन केली आहे ही बाब मला भूषणावह वाटते असा डॉ. नेमाडे यांनी गौरव केला.बहिणाबाई चौधरी मेमोरियल ट्रस्टतर्फे चौधरी वाड्यात बहिणाबाईंचा जन्मदिन, स्मृतिदिन साजरा होतो.
प्रस्तुत कार्यक्रमाच्या सुरूवातीला डॉ. नेमाडे यांच्याहस्ते बहिणाबाईंच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. बहिणाबाई चौधरी मेमोरियल ट्रस्टचे संचालक दिनानाथ चौधरी यांनी डॉ. भालचंद्र नेमाडे यांचे स्वागत केले. कवयित्री शीतल पाटील यांनी कविता सादर केली. निवेदीका ज्योती राणे यांनी डॉ. भालचंद्र नेमाडे यांचा परिचय करून दिला आणि बहिणाबाईंविषयी स्वरचित कविताही सादर केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक किशोर कुळकर्णी यांनी तर सूत्रसंचालन व समारोप ज्ञानेश्वर शेंडे यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अशोक चौधरी, देवेश चौधरी, देवेंद्र पाटील, तुषार हरिमकर यांच्यासह चौधरी वाड्यातील सदस्यांनी सहकार्य केले. कार्यक्रमास बहिणाबाईंच्या नातसून पद्माबाई चौधरी, कंपनीचे मीडिया व्हाईस प्रेसिडेंट अनिल जोशी, कला विभागाचे सहकारी विजय जैन, शोभाबाई चौधरी, कविता चौधरी, हितेंद्र व विवेक चौधरी आदि मान्यवर उपस्थित होते. यावेळी डॉ. नेमाडे यांनी बहिणाबाई संग्रहालयाची पाहणी करून मौलीक सूचना देखील केल्या.