<
व्दिवार्षिक पुरस्काराचे स्वरूप 2 लाख रुपये, सन्मानचिन्ह
जळगाव- (प्रतिनिधी) – जैन इरिगेशनची सेवाभावी संस्था भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाउंडेशनतर्फे जैन इरिगेशनचे संस्थापक भवरलालजी जैन यांच्या सुविद्य पत्नी स्व. कांताबाई यांच्या स्मृतिदिनी स्व. कांताबाई जैन साहित्य-कला जीवनगौरव या नवीन पुरस्काराची घोषणा साहित्य पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक ज्ञानपीठकार डॉ. भालचंद्र नेमाडे यांनी केली. हा व्दिवार्षिक पुरस्कार असून 2 लक्ष रुपये, सन्मानचिन्ह, शाल-श्रीफळ असे याचे स्वरूप असेल. पहिल्या पुरस्काराचे मानकरी खान्देशातील धुळे गोंदूर येथे जन्मलेले ज्येष्ठ शिल्पकार, मूर्तिकार राम सुतार यांना जाहीर झाला आहे. कला आणि साहित्य क्षेत्रातील अखिलभारतीय स्तरावरील कर्तृत्ववान ज्येष्ठ व्यक्तिची निवड या पुरस्कारासाठी केली जाणार आहे.
बहिणाई पुरस्कार, बालकवी ठोमरे पुरस्कार, ना. धों. महानोर पुरस्कार असे व्दिवार्षिक पुरस्कार निवडीसाठी साहित्य निवड समितीची बैठक डॉ. भालचंद्र नेमाडे यांच्या अध्यक्षतेखाली 4 सप्टेंबर रोजी घेण्यात आली. विशेष आमंत्रित म्हणून जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, ना. धों. महानोर, निवड समिती सदस्य राजन गवस, प्रभा गणोरकर, अनुराधा पाटील, शंभू पाटील हे सदस्य उपस्थित होते. या बैठकीत हा पुरस्कार देण्याचे सर्वानुमते ठरले त्यानुसार हा पहिला पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे.
थोर कलावंत, साहित्यिकांना कृतज्ञतापूर्वक अभिवादन म्हणजे ‘स्व. कांताबाई जैन साहित्य कला जीवन गौरव पुरस्कार’
“साहित्यिक-कलाकार आपल्या कलेच्या, कलाकृतींच्या माध्यमातून सामाजिक, सांस्कृतिक जीवन समृद्ध करीत असतात. लेखकाने लिहिलेल्या कलाकृतीतून आयुष्याची वाटचाल बदलण्याचे सामर्थ्य साहित्यकृतीत असते. कधी दगडातील शिल्प अंतरात्म्याला स्पर्श करते, तर कुंचल्यातून विविधरंगी छटांच्या मीलनातून जिवंत सृष्टी साकार होते. थोर कलावंत, साहित्यिकांना कृतज्ञतापूर्वक अभिवादन म्हणजे ‘स्व. कांताबाई जैन साहित्य कला जीवन गौरव पुरस्कार’ होय. माझ्या आईने वाचन संस्कृती जोपासली होती. आजही तिने संकलित केलेली–वाचलेली 500 च्यावर पुस्तके घरातील ग्रंथालयात आहेत. आई-वडिलांकडून मिळालेला वाचनसंस्कार मनाची जडणघडण करणारा आहे. कलेकडे पाहण्याची दृष्टीही त्यांच्यामुळे संस्कारित झाली. साहित्यिक-कलावंतांविषयी आदरभाव त्यांच्या संस्कारांमुळेच निर्माण झाला. प्रस्तुत पुरस्कार त्याच कृतज्ञतापूर्वक सद्भावनेने अर्पण करीत आहोत”.
–अशोक जैन, अध्यक्ष जैन इरिगेशन जळगाव.