<
अमळनेर प्रतिनिधी : अमळनेर पालिकेच्या हद्दीतील नागरिकांकडे मालमत्ता कर व पाणीपट्टी कर अशी सुमारे १६ कोटींची थकबाकी आहे. विशेष म्हणजे गेल्या आठ ते दहा वर्षांपासून अनेकांकडे बाकी असून सुद्धा वसुली होत नसल्याने मुख्यकार्यकारी अधिकारी प्रशांत सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली आज धडक मोहीम राबवित सुमारे पावणेचार लाखाची वसुली करण्यात आली.
उपमुख्याधिकारी संदीप गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली सदर पथकात कर निरीक्षक जगदीश परमार , बिल कलेक्टर सतीश बडगुजर ,विजय पाटील , अविनाश संदानशीव, दिनेश पाटील, सुभाष सोनवणे यांचा समावेश असून या पथकाने थकीत मालमत्ता कर, पाणीपट्टी कर व अनधिकृत नळ संयोजन धारक यांच्यावर कारवाईचे सत्र सुरू केले. ८ रोजी रोजी वसुली मोहिमअंतर्गत सुभाष चौक बाजार गल्ली व ढेकु रोड परिसरातील थकीत मालमत्ता धारकांवर कार्यवाही करण्यात आली. त्याअंतर्गत ८ मालमत्ता धारकांच्या नळ कनेक्शन बंद करण्यात आले. व इतर थकीत मालमत्ता धारकांडून १ लाख रुपये रोख व २ लाख ७० चा धनादेश अशी रक्कम वसूल करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे मोठ्या व अनियमित थकबाकीदारांची नावे वृत्तपत्र तसेच चौकात डिजिटल बॅनर वर प्रसिद्ध करणे , गल्ली बोळात लाऊडस्पीकर वर जाहीर करणे , घरासमोर नाद करणे आदी कारवाया करण्यात येणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी बेअब्रू होण्यापेक्षा थकबाकी भरावी असे आवाहन मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांनी केले आहे.