<
जळगाव(प्रतिनिधी)- कोविड-१९ आजारामुळे निधन पावलेल्या कामगारांच्या कुटुंबीयांना महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या योजनांचा लाभ देण्याचे कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली आहेत. गरजू कामगार पाल्यांनी मंडळाचा योजनांसाठी ऑनलाइन अर्ज सादर करण्याचे आवाहन कल्याण आयुक्त रविराज इळवे यांनी केले आहे. मंडळाकडे कामगार कल्याण निधी भरणाऱ्या नोंदीत आस्थापनातील कामगार व त्यांच्या कुटुंबीयांसाठी मंडळातर्फे विविध आर्थिक लाभाच्या योजनासह कार्यक्रम व उपक्रम राबविण्यात येतात.
यात प्रामुख्याने इयत्ता दहावी व त्यापुढील शिक्षण घेणाऱ्या कामगार पाल्यांसाठी 2000 ते 5000 रुपये शिष्यवृत्ती, परदेशात उच्च शिक्षणासाठी 50,000 रुपये शिष्यवृत्ती, राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत वैयक्तिक खेळांत प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक पटकावणाऱ्या कामगार व कामगार पाल्यांना 2000 ते 15000 हजार रुपये शिष्यवृत्ती, पाठ्यपुस्तक खरेदीच्या किमतीच्या 50 टक्के रक्कम 1500 ते 2500 रुपयांपर्यंत अर्थसाहाय्य,एमएससीआयटी अभ्यासक्रम शुल्काच्या 50 टक्के रुपयांचे अर्थसाहाय्य, गंभीर आजाराच्या उपचारासाठी 5 ते 25 हजार रुपयांचे अर्थसहाय्य, कामगार लेखकांना स्वलिखित पुस्तक प्रकाशनासाठी 10 हजार रुपयांचे अर्थसहाय्य, शिवन मशिन खरेदीसाठी 90 टक्के अर्थसहाय्य, दहावी बारावी परीक्षेत 90 टक्क्यांपेक्षा अधिक गुण प्राप्त करणाऱ्या गुणवंत कामगार पाल्यांचा गौरव आदी योजनांचा समावेश आहे. कामगार कुटुंबीयांना रोजगाराच्या अधिक संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी मंडळातर्फे युनिसेफच्या सहकार्याने कौशल्य विकास प्रशिक्षण वर्ग सुरु करण्यात आले आहे.
कामगाराचा सेवेत असताना मृत्यू झाल्यास पुढील तीन वर्ष त्यांच्या कुटुंबीयांना मंडळाच्या योजना, उपक्रम व कार्यक्रमांचा लाभ घेता येतो. कामगार मंत्री यांनी दिलेल्या निर्देशानुसार आता कोविड19 आजारामुळे निधन पावलेल्या कामगारांच्या कुटुंबियांना देखील मंडळाच्या आर्थिक योजनांचा लाभ देण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी मंडळाच्या नजीकच्या केंद्रात किंवा मंडळाचे संकेतस्थळ www.public.mlwb.in या संकेत स्थळास भेट देण्याचे आवाहन कल्याण आयुक्त रविराज इळवे यांनी केले आहे.