<
२९ डिसेंबर थोर स्वातंत्र्य सेनानी कर्मयोगी धनाजी नाना चौधरी यांचा ६९ वा स्मृतिदिन कार्यक्रम संपन्न
जळगाव – (प्रतिनिधी) – “आजचा तरुण आणि धनाजी नानांचा जीवन प्रवास” या विषयावर विधी सल्लागार सुकन्या महाले यांनी त्यांचा जीवन प्रवास उलगडून सांगताना स्वातंत्र्यपूर्व कालखंडातील आपल्या देशातील शिक्षण व्यवस्था आणि त्या व्यवस्थेत धनाजी नाना यांनी मॅट्रिक शिक्षण झाल्यानंतर एग्रीकल्चर ही पदवी घेण्यासाठी पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात त्यांनी शिक्षण घेत असताना आपल्या सोबत असलेल्या विद्यार्थ्यांनां शिक्षणासाठी मदत व्हावी म्हणून त्यांनी खान्देश मराठा स्टुडंट क्लबची स्थापना केली.त्या क्लब मध्ये ३० ते ३५ विद्यार्थी समाविष्ट होते. विद्यार्थ्यांनां आर्थिक सेवा पुरवणं , विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी मदत करणे, विद्यार्थ्यांची जेवणाची सोय करणे , या सोबतच विद्यार्थ्यांचे व्यक्तिगत प्रश्न सोडवित असतं , जन्म देणारे पालक नसतात तर संपूर्ण जनतेला सुशिक्षित करून त्यांना सुसंस्कृत करून त्यांच्या रोजगाराच्या समस्या सोडवून त्यांना एकत्रित आणि एकोप्याने जगण्याचे धडे देणे ते खऱ्या अर्थाने पालक असतात.
खान्देशाचे स्वतंत्र चळवळीतले जनतेला स्वतःच्या मुलाप्रमाणे सांभाळणारे पालक म्हणजे धनाजी नाना होते. आणि तेच त्यांचं खरं पालकत्व होतं.त्यांनी खिरोदा व जवळपासच्या क्षेत्रातील तरुण उच्च शिक्षिणा पासून वंचित राहू नये या करिता शिकवणी घेवून इंग्रजी विषयाचा अभ्यास करून घेतला.निस्वार्थ समाजसेवा करणे यासारख्या कार्यामुळे जनसमुदायाचा विश्वास धनाजी नानां यांच्यावर बळावला आणि त्या मुळे जनता त्यांच्यावर निस्सीम प्रेम करू लागली. कालांतराने ते नोकरीला असताना त्यांच्या देखत अनेक राजकीय घडामोडी झाल्या याचा त्यांच्या मनावर सकारात्मक परिणाम झाला. आणि देशासाठी राष्ट्रहितासाठी राष्ट्रप्रेम त्यांच्या मनामध्ये उफाळून आले. आपण राष्ट्रहितासाठी काहीतरी करायला हवे ही भावना त्यांच्या मनामध्ये जागृत झाली. आणि धनाजी नानांनी त्यांच्या नोकरीचा राजीनामा दिला. स्वातंत्र्यपूर्व कालखंडातील तरुणाईला सोबत घेऊन त्यांनी ग्रामस्वराज्य या आश्रमाची स्थापना केली. असे प्रतिपादन केले.धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनी जळगाव या संस्थेच्या लोकसेवक मधुकरराव चौधरी समाजकार्य महाविद्यालय आणि शिरीष मधुकरराव चौधरी विज्ञान महाविद्यालय जळगाव राष्ट्रीय सेवा योजना विभागांतर्गत थोर स्वातंत्र्य सेनानी कर्मयोगी धनाजी नाना चौधरी यांच्या ६९ व्या स्मृतिदिनानिमित्त महाविद्यालयात कर्मयोगी धनाजी नाना यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून अभिवादन केले.
याप्रसंगी प्रमुख व्याख्याता म्हणून विधी सल्लागार सुकन्या महाले , प्राचार्य डॉ. राजेंद्र वाघुळदे , प्राचार्य डॉ. यशवंत महाजन , राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी डॉ. निलेश शांताराम चौधरी डॉ. मिलिंद काळे हे व्यासपीठावर उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविकात प्राचार्य डॉ. राजेंद्र वाघुळदे यांनी थोर स्वातंत्र्यसेनानी कर्मयोगी धनाजी नाना चौधरी यांनी ग्रामस्वराज्य आश्रमातून तरुणांना जोडले आणि शिक्षणाचे महत्त्व पटवून देत पाड्यावरच्या तरुणाला शिक्षण कसे मिळेल हा विचार त्या काळात रोवला गेला आणि त्या माध्यमातून सातपुडा विकास मंडळ पाल या संस्थेची स्थापना करून अतिदुर्गम भागातील तरुणांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली.
अंत्योदया कडून सर्वोदय कडे हा प्रवास सुरू झाला असे प्रतिपादन केले. अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ. यशवंत महाजन यांनी आजच्या व्याख्याता सुकन्या महाले यांच्याच व्याख्यानाचा संदर्भ देतधनाजी नानांच्या ग्रामस्वराज्य आश्रमातून सूतकताई प्रशिक्षण त्यांनी अनेकांना दिले, ज्या माध्यमातून जनतेला रोजगार प्राप्त झाला. त्यांचे सर्वात मोठे योगदान तरुणाईच्या मनात रुजलेलं ते म्हणजे अस्पृश्यता निवारण समाजात जातीभेदाने दोन गट निर्माण न होता माणसाने माणुसकीच्या नात्याने वर्तन केले पाहिजे. परंतु आजच्या “तरुणाईची मनस्थिती बघता काळ खरंच सुखावला आहे.? हे प्रकर्षाने जाणवून येते.” त्या कालखंडात त्यांनी अस्पृश्यता निर्मूलनासाठी खिरोदा व संपूर्ण खान्देश स्तरावर प्रयत्न केले.सदर कार्यक्रमाला महाविद्यालयातील विद्यार्थी राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे स्वयंसेवक तथा प्राध्यापक वृंद आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. निलेश चौधरी यांनी केले.