<
तभा वृत्तसेवा
जळगाव, ३ जानेवारी
इतिहास संकलन संस्था, महाराष्ट्र प्रदेश यांच्यावतीने देण्यात येणारा स्व.प्रा.डॉ. सतीश मित्तल संघटन व सामाजिक प्रथम पुरस्कार सोमवार, ३ रोजी धरणगाव येथील दिलीपदादा पाटील यांना संस्थेच्या अधिवेशनात आष्टी, जि. बीड येथे मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला. इतिहास संकलन संस्थेचे पहिले दोनदिवसीय प्रदेश अधिवेशन सोमवारपासून आष्टी येथे प्रारंभ झाले.त्यात हा पुरस्कार प्रदान सोहळा झाला.
या अधिवेशनात इतिहास विषयातील विविध पैलूंवर चर्चा करण्यात येणार आहे. आधुनिक साधनांच्या माध्यमातून संशोधन व इतिहास पुनर्लेखनाची आवश्यकता याबाबत विचारविनिमय करण्यात येईल. तसेच राज्यातील इतिहास विषयातील प्राध्यापकांनी लिहिलेल्या संशोधन पेपरचे सादरीकरणही अधिवेशनात होणार आहे. विविध भागातील नामवंत इतिहास संशोधक या अधिवेशनात सहभागी झाले आहेत.
प्रथमच होणार्या या अधिवेशनात शैक्षणिक, सामाजिक व संघटन क्षेत्रात कार्य करणार्या व्यक्तींना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. त्यात स्व.प्रा.सतीश मित्तल संघटन व सामाजिक पुरस्कार शिक्षण आणि सामाजिक सेवा क्षेत्रात गेली ४० वर्षे कार्यरत असलेले ज्येष्ठ कार्यकर्ते दिलीप रामू पाटील यांना प्रदान करण्यात आला.यावेळी नवी दिल्ली येथील इतिहास संकलन योजना संस्थेचे संघटक बालमुकुंद पांडे, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.प्रमोद येवले, इतिहास संकलन संस्थेचे अरविंद जामखेडकर, आष्टी शिक्षण संस्थेचे इंजि.किशोर हेबडे, ओम उपाध्याय, डेक्कन कॉलेजचे माजी कुलगुरू, डॉ.गोरक्षनाथ देगलूरकर, संस्थेचे अध्यक्ष प्रा.डॉ.राधाकृष्ण जोशी, उपाध्यक्ष प्रा.डॉ.नितीन सराफ, सचिव धनंजय जवळेकर, संघटक रवींद्र पाटील, कोषाध्यक्ष प्रा.डॉ.मुकुंद देवर्षी, संरक्षक रामप्रसाद देशमुख, प्रदेश महिला प्रमुख भारती साठे, कार्याध्यक्ष प्रा.डॉ.व्यंकटेश लांब, उपाध्यक्ष प्रा.डॉ.प्रशांत साबळे, सहसचिव शशिकांत पसारकर, सहसचिव प्रा.डॉ.दीपक शिरसाठ, लेखक प्रमुख प्रा.डॉ.जगदीश बियाणी, विद्वत प्रमुख प्रा.नरेंद्र देशपांडे, युवा प्रमुख प्रा.डॉ. रवी सातभाई व्यासपीठावर होते.
कार्यशील कार्यकर्त्यांचा सन्मान
दिलीपदादा पाटील हे गत ४० वर्षापासून सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत आहेत. जळगावच्या कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे ते राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषद सदस्य आहेत. नुकतीच सहकार भारती या संघटनेच्या राष्ट्रीय संपर्क प्रमुखपदाची आणि धरणगाव येथील श्री बालाजी वहन व्यवस्थापन मंडळाच्या अध्यक्षपदाची जबाबदारीही त्यांच्याकडे आहे. शैक्षणिक व सामाजिक प्रश्नांवर झालेल्या आंदोलन,
कार्यक्रम आणि उपक्रमांचे त्यांनी यशस्वी नेतृत्व केले आहे. दिलीपदादा पाटील यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.