बहुतेक स्त्रियांना मासिक पाळी येते. मुलगी वयात आली की पाळी सुरू होते आणि त्यासोबतच शरीरात अनेक बदल होऊ लागतात. माणसाची प्रजाती पुढे चालू रहावी यासाठी नवा जीव तयार करण्याचं काम स्त्रीच्या शरीरात होऊ शकतं. त्यासाठी स्त्रीच्या शरीरामध्ये बीजकोष आणि गर्भाशय असतं. त्याचं काम मुलगी वयात येते तेव्हा सुरू होतं. मात्र गर्भधारणा आणि नवा जीव तयार करणं, मूल जन्माला घालायचं का नाही हा प्रत्येक स्त्रीचा निर्णय आहे.
काही स्त्रियांच्या शरीरात मात्र गर्भाशय नसतं, बीजकोष नसतात किंवा कधी कधी प्रजनन संस्था नीट काम करत नसते. त्यामुळे मासिक पाळी, अंडोत्सर्जन, गर्भधारणा, गरोदरपण यामध्ये काही अडचणी येऊ शकतात. त्याबद्दल या सदरात आपण नंतर माहिती घेऊ.
स्त्रीचं स्वाभाविक जननचक्र म्हणजे काय?
स्त्रियांच्या पाळी चक्रातले काही दिवस असे असतात जेव्हा गर्भधारणेसाठी पोषक वातावरण तयार होत असतं. बीजकोषातून स्त्रीबीज बाहेर येण्याच्या आधी गर्भाशय, योनीमार्ग आणि ग्रीवा म्हणजेच गर्भाशयाचं मुख यामध्ये काही बदल घडतात जेणेकरून गर्भधारणा सोपी व्हावी. हे बदल आपल्याला समजून घेता येतात. आपल्याच शरीरात होणाऱ्या बदलांचं निरीक्षण केल्यास आपलं शरीर आत्ता कोणत्या अवस्थेत आहे, हे समजून घेता येतं.
जननक्षम असण्याच्या प्राथमिक खुणा
- योनी व गर्भाशयाच्या मुखातून (ग्रीवेतून) पाझरणाऱ्या स्रावात व श्लेष्म्यामध्ये बदल.
- गर्भाशयाच्या मुखाचा पोत, उंची व तोंड उघडण्यामधील बदल
- शरीराच्या मूळ तापमानात वाढ.
इतर खुणा
- मासिक पाळीचक्राच्या मध्यावर पोटाच्या एका बाजूस टोचल्यासारखे दुखणे
- स्तन मोठे, जड, दुखरे होणे
- त्वचा तेलकट व चेहऱ्यावर मुरुम येणे
- कमी-जास्त उत्साही वाटणे आणि मनःस्थितीत बदल
- लैंगिक भावनांमध्ये चढउतार
प्रत्येक स्त्रीसाठी या खुणा नेहमी अशाच असतात असं नाही. मात्र आपल्या शरीरात काय काय घडतंय यावर आपण लक्ष ठेवल्यास आपल्या खुणा आपण नक्की ओळखू शकतो. या खुणा समजल्यास आपल्या पाळी चक्रातला कोणता काळ चालू आहे हे समजून घेता येतं.
‘स्रोत – तथापि ट्रस्ट निर्मित Let’s Talk Sexuality – सेक्स आणि बरंच काही’