<
मुंबई, दि.17 : अवैधरित्या अन्नधान्य साठवणूक करणारे गोदामचालक ओमप्रकाश यादव व टेम्पो चालक मोहिद्दीन शेख यांच्याविरूद्ध भरारी पथकाने कारवाई केली असून त्यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे, नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा कान्हुराज बगाटे यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.
मुंबई-ठाणे शिधावाटप क्षेत्रात अन्नधान्याचे वितरण सुरळीत होणे तसेच अन्नधान्य पुरवठा व वितरणामध्ये कोणताही गैरप्रकार होणार नाही याकरिता नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा यांचे मार्गदर्शनाखाली भरारी पथक गठित करण्यात आलेले आहे. या भरारी पथकामार्फत जीवनावश्यक वस्तू कायदा 1955 अतंर्गत 14 जानेवारी 2022 रोजी अवैधरित्या अन्नधान्याची वाहतूक करणाऱ्या टेम्पो क्र. एम.एच.01-डीआर.1780 चा चालक मोहिद्दिन बाबू शेख याचे विरुद्ध तुर्भे पोलीस ठाणे येथे जीवनावश्यक वस्तू कायदा 1955 अतंर्गत गुन्हा (नोंद क्रमांक 11/2022) दाखल करण्यात आलेला आहे. या कारवाईमध्ये 7,830 किलो गहू व टेम्पो असा एकुण रुपये 13,66,430/- किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
टेम्पोचालक मोहिद्दिन बाबू शेख याने दिलेल्या माहितीनुसार भरारी पथकाने जगताप कंपाऊड, सावित्रीबाई फुले शाळेच्या बाजूला असलेल्या कंपाऊडच्या आत पत्र्याच्या शेडमध्ये अनधिकृतपणे अन्नधान्याचा अवैध साठा आढळून आल्याने या ठिकाणी छापा टाकून एकूण 42 हजार 506 किलो गहू व 8 हजार 085 किलो तांदुळ असा एकूण रुपये 16 लाख 19 हजार 800/- किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून गोदाम चालक ओमप्रकाश यादव याचेवर नेहरु नगर, पोलीस ठाणे, कुर्ला येथे जीवनावश्यक वस्तू कायदा 1955 अतंर्गत गुन्हा (नोंद क्रमांक 2/2022) दि. 15 जानवारी 2022 रोजी दाखल करण्यात आलेला आहे.
नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा कान्हुराज बगाटे यांच्या मार्गदर्शनाखालील भरारी पथकात शिधावाटप निरीक्षक सर्वश्री भगवान खंडेराव, सुशिल साळसकर, संदिप चौधरी, अमोल बुरटे, तसेच स्थानिक शिधावाटप कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी विलास उदुगडे, विजय राठोड, नागनाथ हंगरगे, गजानन फाले, राजेश सोरटे, मंगेश राणे, संदिप साबळे, बाळासाहेब कारंडे तसेच तुर्भे पोलीस ठाणे व नेहरु नगर पोलीस ठाणे येथील पोलीस अधिकारी व कर्मचारी सहभागी होते, अशी माहिती नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा विभागाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.