<
देशमुख महाविद्यालयात वाड्मय अभ्यास मंडळाचे उद्घाटन संपन्न
सौ. रजनीताई नानासाहेब देशमुख कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात ‘वाड्मय अभ्यास मंडळा’चे उद्घाटन संपन्न झाले. याप्रसंगी उद्घाटक व वक्ते म्हणून सुप्रसिद्ध कवी, कथाकार व समीक्षक प्रा. डॉ. सखाराम डाखोरे (अण्णासाहेब वर्तक मानव्य महाविद्यालय, वसई, जि. पालघर) होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.एन.एन. गायकवाड होते. उद्घाटनपर मनोगतात डॉ. सखाराम डाखोरे म्हणाले की, “वाड्मय मंडळाच्या माध्यमातून महाविद्यालयामधल्या तरुणाईला आपल्यातील सकारात्मक ऊर्जा दाखविण्याचे एक सशक्त व्यासपीठ उपलब्ध होते. कथा, कविता, निबंध, वक्तृत्व, अभिनय अशा विविध माध्यमांतून विद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुणांना वाव मिळतो. एक कवी म्हणून असा अनुभव आहे की, कविता ही वेदनेतून जन्म घेते. साहित्य हे समाज परिवर्तनाचे एक प्रभावी साधन आहे. साहित्याने भांडवलशाही व्यवस्थेवर भाष्य केले पाहिजे. राजकीय व्यवस्थेला प्रश्न विचारले पाहिजे. तेव्हाच ते साहित्य समाजाभिमुख बनते. स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या मानवी मूल्यांचा साहित्याने सतत जागर करायला हवा. निसर्ग हा सार्वभौम आहे. विज्ञानाचा जन्मसुद्धा निसर्गातूनच होतो. त्यामुळे भांडवलशाही व्यवस्थेने निसर्गाविरुद्ध उभे केलेले षडयंत्र साहित्याने लोकांपुढे मांडले पाहिजे. जल, जंगल आणि जमीन यांच्या रक्षणासाठी साहित्याने उभे राहिले पाहिजे.”
यावेळी डॉ. डाखोरे यांनी आपल्या अनेक बहारदार कविता गेय पध्दतीने सादर केल्या. ‘शेतामध्ये राबती कष्टती अपार । मायबाप माझे इळा कोयत्याची धार’ ही अत्यंत गाजलेली स्वतःची कविता सादर केली. त्यांनी आपल्या कवितांबरोबरच वाहरू सोनवणे, भुजंग मेश्राम, दासू वैद्य आणि इतर कवींच्या कवितासुद्धा सादर केल्या.
प्राचार्य डॉ.एन.एन. गायकवाड यांनी आपले अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन मराठी विभागप्रमुख डॉ. अतुल देशमुख यांनी केले. विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. दिपक मराठे यांनी उपस्थितांचे आभार मानले. ऑनलाइन पद्धतीने पार पडलेल्या या कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.