<
राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त ऑनलाईन व्याख्यानाचे आयोजन
नाशिक : दिनांक २५ (जिमाका वृत्त) – ‘जेव्हा चांगले लोक मतदान करत नाहीत तेव्हा वाईट लोक निवडून येतात’, विसंगती अशी की, असे बोलणारेच लोक मतदान करण्याबाबत दक्ष नसतात. लोकशाहीत वाईट प्रवृत्तींना रोखायचे असेल तर भारतीय संविधानातून घटनाकारांनी आपल्याला मतदानाचे भेदक अस्र बहाल केलंय. या अस्राचा अचूक वापर करावयास हवा. अमिष, प्रलोभन, पैसा, दडपण याररख्या कुठल्याही प्रवृत्तीला बळी न पडता सामाजिक व संसदीय लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी आवर्जुन मतदान केले पाहिजे. ‘सत्पात्री मतदान करणे म्हणजे संविधानाचा सन्मान राखणे,’ हाच सन्मान भारतीय मतदारांकडून घटनाकारांना अपेक्षित आहे, असे प्रतिपादन आज जिल्हा माहिती अधिकारी रणजितसिंह राजपूत यांनी केले आहे.
ते आज महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित लोकनेते व्यंकटराव हिरे महाविद्यालयात आयोजित राष्ट्रीय मतदार दिनाच्या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून दूरदृष्य प्रणालीद्वारे बोलत होते. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.एस. जगदाळे, उपप्राचार्य डॉ. नंदू पवार, राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. कुणाल वाघ अंतर्गत गुणवत्ता विभागाच्या प्रा. डॉ. मृणाल भारद्वाज, राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी प्रा. डॉ. राकेश पाटील, प्रा. कल्पना निकम, सर्व पर्यवेक्षक, सर्व विभागाचे विभाग प्रमुख, सर्व प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना श्री. राजपूत म्हणाले,आपले मत कोणालाही असो किंवा एकालाही नसो पण आपण कर्तव्य म्हणून मतदान केले पाहिजे कारण ती आपली संविधानिक जबाबदारी आहे. ते कर्तव्य लोकशाहीप्रती, देशाप्रती किंवा आपल्याप्रती असते, आपल्या भविष्याच्या हितासाठी असते. ही जाणीव ठेवून आवर्जुन मतदान केले पाहिजे. आपले भविष्य कसे असावे हे आपल्या मतदानाने ठरत असते, कारण आपल्या देशाचा कारभार पाहणारे कारभारी आपण मतदानातून निवडत असतो. घटनाकारांना अपेक्षित असलेल्या मतदानाच्या अधिकाराचा अर्थ नीट समजून घेण्याची गरज आहे. भारताची लोकशाही ही लोकांनी सामाजिक लोकशाहीतून चालवलेली राज्यपद्धती आहे. पण देशातला प्रत्येक नागरीक संसदेत अथवा विधिमंडळात कारभारावर चर्चा करू शकत नाही, म्हणून त्याने आपले प्रतिनिधी विधिमंडळात पाठवून त्यांच्यामार्फत देशाचा कारभार पहावा अशी अपेक्षा आहे. हे प्रतिनिधी जेवढे चांगले असतील तेवढा देशाचा कारभार चांगला होईल आणि लोकांच्या हिताचा होईल. मात्र याबाबतीत प्रत्येक नागरिकाने मतदान करून आपले मत व्यक्त केले पाहिजे. जे लोक मतदान करणार नाहीत ते स्वत:ची जबाबदारी व कर्तव्याबाबत उदासीन होते, म्हणून देशाचा भविष्यकाळ त्यांना कधीच माफ करणार नाही, असेही श्री. राजपूत यांनी यावेळी सांगितले.
“विद्यार्थ्यांमध्ये लोकशाहीची तत्वे व मूल्ये रुजवण्याची महत्वपूर्ण भूमिका शिक्षकांची असते. सुजाण विद्यार्थी घडला तरच सुजाण मतदार तयार होईल व लोकशाही अबाधित राहील.” असे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.एस. जगदाळे यांनी अध्यक्षीय मनोगतात अधोरेखित केले. “मतदान हक्क नसून, एक कर्तव्य आहे. समाजातील सर्व घटकांनी मतदानाचा हक्क बजावला तर ते राष्ट्रनिर्मितीच्या प्रक्रियेत मोठे योगदान देऊ शकतील” असेही त्यांनी नमूद केले.
तत्पूर्वी कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाच्या राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. कुणाल वाघ यांनी केले. यावेळी त्यांनी मतदार दिन साजरा करण्याचे ध्येय व उद्धिष्ट स्पष्ट केले. विद्यार्थ्यांना विद्यार्थी दशेतच मतदानाचे महत्व समजले तर सुयोग्य शासन प्रणाली विकसित होईल तसेच एक सक्षम राष्ट्र तयार होईल असे नमूद केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. डॉ. राकेश पाटील यांनी केले तर प्रमुख पाहुण्यांचा परिचय व आभार प्रा. कल्पना निकम यांनी केले.