<
पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित सौ. रजनीताई नानासाहेब देशमुख कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाने सुरू केलेल्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी ‘करिअर कट्टा’ उपक्रमांतर्गत तीन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शासनाच्या ‘करिअर कट्टा’ या उपक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुणे व प्रमुख वक्ते म्हणून जळगाव येथील श्री सुर्वे पाटील उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, स्पर्धा परीक्षांचे योग्य नियोजन करावे, कोणतीही परीक्षा ही मेहनतीने जिद्दीने यशस्वी होऊ शकते. आयएएस, आयपीएस परीक्षा पास करणारे साधारण विद्यार्थी जास्त प्रमाणात आहेत. ही परीक्षा पास करण्यासाठी जिद्द आणि संयमाची आवश्यकता आहे, असेही प्रतिपादन त्यांनी केले.
कार्यशाळेचे अध्यक्ष म्हणून प्राचार्य डॉ. एन एन गायकवाड उपस्थित होते. त्यांनी महाविद्यालयात राबवत असलेल्या या उपक्रमांचा विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन केले. महाविद्यालयामध्ये ग्रंथालय सुविधा, विविध वर्तमानपत्रे, साप्ताहिके, मासिके यांचा जास्तीत जास्त वापर करून आपली ध्येयपूर्ती करावी, असे मत व्यक्त केले. करिअर कट्टाचे समन्वयक प्रा.डॉ. बी. एस. भालेराव यांनी बोलताना करिअर कट्टा या उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांनी आपली नोंदणी पूर्ण करावी. वर्षभर या उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले जाणार आहे, असे मत व्यक्त केले. याप्रसंगी महाविद्यालयाचे कला व वाणिज्य शाखेचे समन्वयक डॉ. एस.डी. भसे, डॉ.एस. जी. शेलार उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. प्रदीप वाघ यांनी केले तर आभारप्रदर्शन डॉ. जी. डी. चौधरी (उद्योजकता समन्वयक) यांनी केले. कार्यक्रमाला सर्व प्राध्यापक, प्राध्यापकेतर सहकारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.