<
जळगाव, दि. 8 (जिमाका वृत्तसेवा) :- आदिवासी विकास विभागाच्या नाशिक विभागांतर्गत असलेल्या आदर्श आश्रमशाळा, देवमोगरा ता. नवापूर जि. नंदुरबार येथे सन 2022-23 या शैक्षणिक वर्षात इयत्ता 5 वी मध्ये अनुसुचित जमातीच्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार आहे. जे विद्यार्थ्यांनी या शाळेत प्रवेश घेवू इच्छीतात अशा विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेतील मुख्याध्यापकामार्फत प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, यावल, जि. जळगाव यांचेकडे 28 फेब्रुवारी 2022 पर्यंत अर्ज सादर करावेत.
या आश्रमशाळेत प्रवेश मिळण्यासाठी स्पर्धा परिक्षा 3 एप्रिल, 2022 रोजी सकाळी 11 ते 12.30 या वेळेत आयोजित करण्यात आली आहे. जे आदिवासी विद्यार्थी सन 2021-22 या शैक्षणिक वर्षामध्ये इयत्ता 4 थी च्या वर्गात शिकत असून परीक्षेला बसणार आहेत. व पुढील वर्षी इयत्ता 5 वी मध्ये प्रवेश घेणार आहेत. अशा विद्यार्थ्यांकरीता शासकीय माध्यमिक आश्रमशाळा, गंगापूरी, ता. जामनेर, जि. जळगाव आणि शासकीय माध्यमिक आश्रमशाळा, दहिवद, ता. अंमळनेर, जि. जळगाव या दोन केंद्रावर परिक्षा आयोजित करण्यात येणार आहे.
ही परिक्षा शासकीय आश्रमशाळा, अनुदानित आश्रमशाळा, जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेत असलेले इयत्ता 4 थीत शिकत असलेल्या अनु. जमातीच्या विद्यार्थ्यांकरीता पूर्णत: खुली आहे. ही परिक्षा पुर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परिक्षेच्या धर्तीवर आधारित आहे. या आश्रमशाळेत प्रवेशासाठी विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक कमाल उत्पन्न रु. एक लाखाच्या आत असावे.
इच्छुक विद्यार्थ्यांच्या पालकांनी प्रवेश परिक्षेचा अर्ज, गटशिक्षण अधिकारी, पंचायत समिती किंवा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यावल या कार्यालयातून उपलब्ध करुन घ्यावा. असे आवाहन सहा. प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यावल यांनी एका प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.