<
जळगाव, दि. 8 (जिमाका वृत्तसेवा) :- महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सन 2022 मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षांचा अंदाजित वेळापत्रक आयोगाकडून निश्चित करण्यात आले असून सदर वेळापत्रक आयोगाच्या www.mpsc.gov.in या संकेतस्थळावर (वेबसाईटवर) प्रसिध्द करण्यात आले आहे.
शासनामध्ये मागणीनुसार शासन सेवेतील विविध पदांवरील भरतीकरिता आयोगामार्फत वर्षभर विविध परीक्षांचे आयोजन करण्यात येते. त्यानुसार सन -2022 मध्ये घेण्यात येणाऱ्या विविध परीक्षांचे दिनांक निश्चित करण्यात आले आहेत. प्रस्तावित परीक्षेचे वेळापत्रक निश्चित करताना संघ लोकसेवा आयोग, विविध विद्यापीठे, परीक्षा घेणाऱ्या इतर संस्था इत्यादिंकडून आयोजित करण्यात येणाऱ्या परीक्षांचे वेळापत्रक विचारात घेऊन आयोगाच्या परीक्षांचे वेळापत्रक निश्चित करण्यात येते. जेणेकरुन, आयोगाच्या व संबंधित संस्थांच्या परीक्षा एकाच दिवशी येणार नाही व उमेदवारांचे नुकसान होणार नाही. यासंदर्भात विधीमंडळातही अनेकवेळा चर्चा झाली असून त्यावेळी विधीमंडळात देण्यात आलेल्या आश्वासनानुसार कोणत्याही परीक्षा एकाच दिवशी येणार नाहीत, याची दक्षता घेणे गरजेचे आहे. त्यानुसार सर्व संबंधित संस्थांना प्रस्तावित वेळापत्रकाची प्रत पाठवून यासंदर्भात दक्षता घेण्याची विनंती करण्यात आली आहे.
शासनाकडून संबंधित संवर्ग / पदांसाठी विहित वेळेत मागणीपत्र प्राप्त होईल, या गृहितकाच्या आधारे अंदाजित वेळापत्रक प्रस्ताविक करण्यात आले आहे. शासनाकडून विहित वेळेत मागणीपत्र प्राप्त झाल्यास नियोजित महिन्यामध्ये पदे विज्ञापित करणे व वेळापत्रकाप्रमाणे परीक्षा घेणे शक्य होईल, वेळापत्रक अंदाजित असून जाहिरातीच्या अथवा परीक्षेच्या प्रस्तावित महिना/दिनांकामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल होऊ शकतो, असा बदल झाल्यास तो आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल, अंदाजित वेळापत्रकाबाबची सद्यस्थिती दर्शविणारी अद्ययावत माहिती (Updates) वेळोवेळी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल. संबंधित परीक्षेची परीक्षायोजना, अभ्यासक्रम, निवड पध्दत इत्यादी तपशील आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे. व आयोगाच्या धोरणानुसार वेळोवेळी अद्ययावत करण्यात येईल.
संबंधित परीक्षेमधून भरावयाच्या पदसंख्येबाबतचा सविस्तर तपशिल जाहिरात/अधिसूचनेव्दारे उपलब्ध करुन देण्यात येईल असे सह सचिव महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुबंई, सुनिल अवताडे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.