<
मुंबई-राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी काँग्रेससोबत युती करणार नाही. काँग्रेससोबत चर्चेची दारे आता बंद झाली आहेत,’ असं ’वंचित’चे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी आज जाहीर केलं. त्यामुळं वंचित बहुजन आघाडी स्वबळावर लढणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.
मुंबईतील एका पत्रकार परिषदेत आंबेडकर यांनी ही घोषणा केली. भारिप बहुजन महासंघ व ’एमआयएम’च्या वंचित बहुजन आघाडीनं लोकसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर मतं मिळवली होती. औरंगाबादमध्ये आघाडीचा खासदारही निवडून आला. त्यामुळं विधानसभा निवडणुकीत ’वंचित’ला विशेषत: प्रकाश आंबेडकरांच्या पक्षाला सोबत घेण्याचे प्रयत्न काँग्रेस-राष्ट्रवादीनं सुरू केले होते. मात्र, राष्ट्रवादीला वगळून काँग्रेससोबत युती करण्यात आंबेडकरांना रस होता. त्यासाठी त्यांनी थेट 50 टक्के जागांची मागणी काँग्रेसकडं केली होती. त्याला काँग्रेसकडून फारसा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळं आंबेडकरांनी आज ’एकला चालो रे’चा नारा देत स्वबळावर निवडणूक लढण्याची घोषणा केली.
अनंत चतुर्दशीनंतर ’वंचित’च्या उमेदवारांची यादी जाहीर केली जाईल, असं आंबेडकर यांनी यावेळी सांगितलं. ’144-144 जागांचा प्रस्ताव आम्ही काँग्रेसपुढं ठेवला होता. मात्र, त्यास काहीही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळं आम्ही आता चर्चा थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. अन्य जे पक्ष येतील, त्यांना सोबत घेऊ,’ असं त्यांनी स्पष्ट केलं.
कसल्या जाचक अटी?
’वंचित’नं युतीसाठी काँग्रेसपुढं जाचक अटी ठेवल्याचा आरोप आंबेडकर यांनी फेटाळून लावला. ’ज्या जागांवर काँग्रेसचा तीनपेक्षा अधिक वेळा पराभव झाला आहे, त्या जागा आम्ही मागितल्या होत्या. हरलेल्या जागा मागणं यात जाचक काय आहे,’ असा प्रतिप्रश्न आंबेडकर यांनी केला. खरंतर काँग्रेसच्या वागणुकीत अद्याप कोणताही फरक पडलेला नाही. त्यांच्याकडून होणार्या ब्लॅकमेलिंगमुळं आम्हीच काय, इतर घटक पक्षही त्यांच्यासोबत जात नाहीत,’ असा दावा त्यांनी केला.