<
जळगाव, दि. 22 (जिमाका वृत्तसेवा ) :- महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे शनिवार 26 फेब्रुवारी, 2022 रोजी महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पुर्व परीक्षा-2021 ही जळगाव शहरातील 32 उपकेंद्रावर सकाळी 11 ते दुपारी 12 या वेळेत होणार आहे. परीक्षा कालावधीत परीक्षा केंद्र परिसरात मनाई आदेश लागू राहतील. याबाबतचे आदेश जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिले आहेत.
जिल्हाधिकारी श्री. राऊत यांनी म्हटले आहे, या परीक्षा केंद्राचे ठिकाणी गैरप्रकार होऊ नये व त्या ठिकाणी शांतता व सुव्यवस्थेस बाधा निर्माण होऊ नये, खबरदारीचा उपाय म्हणून फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम (1)(2) व (3) खाली प्रदान करण्यात आलेल्या अधिकारानुसार पुढील प्रमाणे आदेश देत आहे.
26 फेब्रुवारी, 2022 रोजी जळगाव शहरातील एकूण 32 उपकेंद्रावर सकाळी 11 ते दुपारी 12 या कालावधीत पेपर सुरु झाल्यापासून ते संपेपर्यंतच्या कालावधीसाठी जिल्ह्यांतील सर्व परीक्षा केंद्राचे 100 मीटर परिसरात कोणीही प्रवेश करु नये. सदर परीक्षेचे दिवशी सकाळी 8 वाजेपासून ते पेपर रवाना होईपर्यंत प्रत्येक उपकेंद्रावर 3 पुरुष व 2 महिला पोलिस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त तैनात करावा, परीक्षा केंद्राजवळच्या 100 मीटर परिसरातील सर्व सार्वजनिक टेलिफोन/एस.टी.डी./आय.एस.डी/फॅक्स केंद्र/ झेरॉक्स दुकाने, कॉम्प्युटर दुकाने व ध्वनीक्षेपक शनिवार 26 फेब्रुवारी 2022 रोजी सकाळी 10 ते दुपारी 12 या कालावधीत बंद ठेवण्यात यावेत.