<
मुंबई-आरे कॉलनीतील दोन हजारांहून अधिक झाडं तोडून तिथं मेट्रो प्रकल्पासाठी कारशेड उभारण्याच्या मुंबई मेट्रो रेल्वे महामंडळाच्या निर्णयाला शिवसेनेनं कडाडून विरोध दर्शवला आहे. शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी आज या संदर्भातील भूमिका पुन्हा एकदा स्पष्ट केली. ’मुंबईतील पर्यावरणाच्या बाबतीत कोणाचीही मनमानी आम्ही सहन करणार नाही,’ असं त्यांनी ठणकावून सांगितलं.
शिवसेना भवनात आज झालेल्या पत्रकार परिषदेत आदित्य यांनी मेट्रोच्या कारशेडला विरोध करण्यामागची कारणमीमांसा सांगितली. तज्ज्ञांच्या मदतीनं त्यांनी यावेळी ’आरे’तील जैवविधतेचं सादरीकरणही केलं. ’शिवसेनेचा मेट्रोला अजिबात विरोध नाही. फक्त ’आरे’मध्ये होणार्या कारशेडला विरोध आहे,’ असं त्यांनी स्पष्ट केलं. कारशेडला विरोध करण्यामागे कुठलंही राजकारण नाही. एक मुंबईकर व पर्यावरणप्रेमी म्हणून मी ही भूमिका मांडत आहे. मुंबईसाठी मेट्रो आवश्यक आहे. त्यामुळंच मेट्रोच्या कामामुळं मुंबईकरांना त्रास होत असतानाही आम्ही संयमाची भूमिका घेतली. अनेक रस्त्यावर खड्डे पडले, काही वेळा झाडे तोडली गेली. मात्र, पायाभूत सुविधांचा प्रश्न असल्यानं शिवसेनेनं विरोध केला नाही. मात्र, ’आरे’तील कारशेड हा विषय वेगळा आहे,’ असं आदित्य म्हणाले.