<
राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसार मंडळाची सर्वसाधारण सभा ही दि.27 मार्च 2022 रोजी ऑनलाईन पध्दतीने होत असून या निर्णयाला सभासदांनी विरोध दर्शविला आहे. कोरोनाची लाट पूर्णपणे ओसरली असून शासनाच्या वतीने सर्व निर्बध उठवून सर्वत्र अनलॉक घोषित करत असतांना संस्थेतील सत्ताधारी संचालक सर्वसाधारण सभा ही ऑनलाईन पध्दतीने का घेत आहे असा प्रश्न सभासदांनी उपस्थित केला आहे.
वर्षात एकदा सर्वसाधारण सभा घेतली जाते त्यात सभासद संचालकांकडे प्रश्न उपस्थित करून संस्थेच्या हिताची चर्चा या सभेत होत असते. मात्र सत्ताधारी संचालक चर्चेतून पळ काढण्यासाठी तसेच बोगस शिक्षक भरती,जागा विक्री प्रश्नावर सभासद आक्रमक झाले असून सभासदांच्या रोषाला सामोरे जावे लागेल हया एकमेव हेतूने ही सर्वसाधारण सभा ऑनलाईन घेतली जात असल्याचा आरोप देखील सभासदांकडून या निमित्ताने केला जात आहे.राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळाच्या कार्यकारिणीच्या दि.6 फेब्रुवारी 2022 च्या बैठकीत केवळ सर्वसाधारण सभाच्या तारीख ठरविण्याबाबत चर्चा झाली.
ती सभा ऑनलाईन की ऑफलाईन याबाबत कोणतीही चर्चा चेअरमन डॉ.एम.बी.पाटील व सचिव अरूण निकम यांनी केली नाही अशी माहिती संचालक धनजंय चव्हाण यांनी दिली आहे.राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळाचे सभासद हे वयस्कर असून त्यांना अॅनरॉईड फोन वापरता येत नाही ही वस्तूस्थिती आहे त्याचप्रमाणे ग्रामीण भागात कनेक्टीविटीची अडचण असल्याने अनेक सभासद इच्छा असून सहभागी होऊ शकत नाही त्याचप्रमाणे ऑनलाईन बैठकीला अनेक तांत्रिक अडचणी येत असल्याने अनेक अडचणीचा सामना करावा लागतो त्यामुळे ही सर्वसाधारण सभा ऑनलाईन न घेता ऑफलाईन घ्यावी अशी मागणी देखील जागृत सभासदांनी केली आहे.